Santosh Deshmukh Case: काल ढगाआड गेलेला सूर्य आज दिसतोय, पण माझे वडिल कधीच दिसणार नाही; सरपंचांची लेक उभारली, जनता गहिवरली
Santosh Deshmukh Case Muk Morcha: काल ढगाआड गेलेला सूर्य आज दिसतोय, पण माझे वडिल कधीच दिसणार नाही म्हणत तिने जमलेल्या नागरिकांना भावनिक साद घातली आहे.

बीड: बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनसागर रस्त्यावरती लोटला आहे. बीडमध्ये सर्व संघटना आणि सर्वपक्षीय नेते रस्त्यावर आले आहेत, बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मूक मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने मोर्चात नागरिकांनी हजेरी लावली. हातात न्यायाचे फलक घेऊन महिला देखील या मोर्चात सामील झाल्या आहेत. आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावामध्ये कडकडीत बंद आहे. या मोर्चावेळी बोलताना संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने आज हा दिवस आमच्या परिवाराला पाहावा लागत आहे, अशी वेळ कोणावर येऊ नये, यासाठी आपण एकत्रित येऊ आणि त्याची दक्षता घेऊ असं आवाहन केलं आहे. तर काल ढगाआड गेलेला सूर्य आज दिसतोय, पण माझे वडिल कधीच दिसणार नाही म्हणत तिने जमलेल्या नागरिकांना भावनिक साद घातली आहे.
नेमकं काय म्हणाली वैभवी देशमुख?
'आत्ताच मला माझ्या चाचाने सांगितलं, माझ्या वडिलांचा जन्म हा इथेच झाला होता. आनंद हॉस्पिटलमध्ये आणि माझ्या पणजीने त्यांचा नाव इथल्या संतोषी माते वरून संतोष असं ठेवलं होतं. म्हणून मी याच ठिकाणावर तुम्हा सर्वांना एक विनंती करते, माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे, तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्यांची हत्या कशाप्रकारे झाली. त्यांचा याच्यामध्ये काही गुन्हा नसताना ते समाजसेवक असताना, समाजासाठी त्यांनी कार्य केले आणि शेवटपर्यंत ते समाजासाठी झुंजत होते. त्या दिवशी सुद्धा एका दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना हा प्रसंग घडला. ही वेळ आज माझ्यावर आणि माझ्या कुटुंबाला ही वेळ आली आहे, दुसऱ्या कोणावर ही वेळ येऊ नये याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असं वैभवी देशमुख यावेळी बोलताना म्हणाली आहे.
तर, 'जसं काल आभाळ आलं होतं, सूर्य झाकला होता. आज ऊन पडलं आहे, आज सूर्य चांगला प्रकारे दिसतो. पण, माती आड गेलेले माझे वडील मला कधी दिसणार नाही आणि त्यांचं हे बलिदान आपण व्यर्थ म्हणून जाता कामा नये. तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत राहा आणि माझ्या कुटुंबासोबत राहा. माझ्या वडिलांना न्याय मिळवून घेऊ, हा लढा आपण सर्वांनी एकत्र येऊन पुढे जाऊन लढू. हा अन्याय होतो आहे हा अन्याय पुन्हा होऊ नये म्हणून आपण लढू. आपण मिळून पुढे जाऊ माझ्या वडिलांना आणि आपल्याला सर्वांना न्याय मिळवून घेऊ, तुम्ही असेल सोबत राहा असं आवाहनही तिने यावेळी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
