लंडनमध्ये शिवजयंती दणक्यात; तीर्थाच्या पुढाकाराने स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पहिल्यांदाच फडकला मराठी झेंडा
संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून तीर्था उदय सामंत हिने मंडळाच्या संकल्पनेमागील उद्देश यावेळी सगळ्यांना सांगितला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ संकल्पनेला प्रतिसाद देत, लंडन (London) स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (एलएसइ) येथे पहिल्यांदाच मराठी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्टर राज्याचे मंत्री उदय सामंत (Uday samant) यांची कन्या तीर्था उदय सामंत हिने पुढाकार घेत हे मंडळ सुरू केले आहे. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या (Shivjayanti) निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या आशीर्वादाने झाली, तर समाप्ती शिवगर्जनेने करण्यात आली. संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून तीर्था उदय सामंत हिने मंडळाच्या संकल्पनेमागील उद्देश यावेळी सगळ्यांना सांगितला. आपल्या जन्मभूमीपासून कोसो दूर, साता समुद्रापरही मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा झेंडा तीर्था यांनी फडकवला.
'वीज वाचवायची, तर तिचा वापर कमी करावा लागतो; पण भाषा वाचवायची, तर तिचा वापर वाढवावा लागतो', कौशल इनामदार यांनी काही वर्षांपूर्वी उच्चारलेलं हे वाक्य माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं. जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी माझ्या मराठीशी जोडलेली माझी नाळ तुटू नये, असे संस्कार आई-वडिलांनी बाळकडू स्वरूपातच दिले. आईचं समाजकार्य, लेखनकौशल्य आणि वडिलांची राजकीय वाटचाल बघत मी मोठी झाले. आपणदेखील आपल्या मातीचे आणि भाषेचं देणं कोणत्या ना कोणत्या रूपात फेडायला हवं, असं नेहमीच वाटत. याच भावनेतून लंडनमध्ये मायबोली आणि मायदेशी मराठी भाषेचा गोडवा जपला व वाढला जावा या उद्देशाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मराठी मंडळाची स्थापना केली. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा मुहूर्तही साधल्याचे तीर्था सामंत यांनी सांगितले.
शिवजंयतीनिमित्ताने, मराठी संस्कृतीचे वैशिष्ट्य अधोरेखित करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्थळे ओळखण्याचा खेळ, मराठी खाद्यपदार्थ त्यांच्या इंग्रजी वर्णनांवरून ओळखणे, ‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे विशेष स्क्रीनिंग असे अनोखे उपक्रम लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये राबवले गेले. कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रीयन स्नॅक्सचा आस्वाद घेत नेटवर्कींग आणि गप्पांचा आनंदही घेण्यात आला. ‘एलएसइ’मध्ये पंजाबी, तेलुगू, तमिळ आदी भाषांची मंडळे असताना मराठी मंडळ नव्हते. तीर्था उदय सामंत हिने सर्व प्रक्रिया पूर्ण करून 20 जानेवारी 2025 रोजी अधिकृत नोंदणी केली. या मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषा आणि साहित्यावर आधारित विशेष सत्रे आणि उपक्रम राबवले जाणार आहेत.
शिवगर्जनेसह मराठी गेम्सने वेधले लक्ष
महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणे चित्रांवरून ओळखा, खाद्यपदार्थ त्यांच्या इंग्रजी वर्णानावरुन ओळखा असे संस्कृतीदर्शन खेळ यावेळी खेळण्यात आले. तर, छावा या चित्रपटाच्या ट्रेलरचे स्क्रिनींग, महाराष्ट्रातील स्नॅक्सचा लाभ आणि नेटवर्कींग गप्पा झाल्या. कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या आशीर्वादाने व समाप्ती शिवगर्जनेनं केली.
हेही वाचा
ती आता चूक आता होणार नाही, एप्रिल-मे महिन्यात निवडणुका; उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

