BLOG : विक्रम, तुझ्या या जिद्दीला सलाम!

BLOG : हातात काठी, मेंढरांचा घोळका आणि घोड्यांच्या पाठीवर संसार टाकून रोज एका गावाची पायपीट... व्यवसायाने मेंढपाळ असलेले जिजाबा शेंडगे आणि त्यांच्यासोबत या व्यवसायाचं आणि संसाराचं चाक ओढणाऱ्या त्यांच्या पत्नी. पोटापाण्यासाठी गावोगावी फिरणारं हे दाम्पत्य कुणी साधंसुधं नसून एका अधिकाऱ्याचे ते आई-वडील आहेत. तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना? एखाद्या सिनेमालाही लाजवेलअशी ही कहाणी आहे विक्रांत शेंडगेची.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या मुंबई मंत्रालय महसूल सहायकपदाच्या स्पर्धा परीक्षेत विक्रांतने विजयाचा झेंडा रोवलाय. व्यंगत्वावर मात करत त्याने हे यश संपादीत केलंय. दुष्काळी भागातील मान तालुक्यातील मासाळवाडी गावचा हा तरुण आहे.
घरची परिस्थिती अतिशय हलाकीची असल्याने कष्ट पाचवीला पुजलेलं. आई-वडील सहा-सहा महिने मेंढरांमागे जात असल्याने मुलांकडे, त्यांच्या शिक्षणाकडे त्यांचं फारसं लक्षही नसायचं. मुलगा कितवीत शिकतो हे विचारलं तरी त्यांना सांगता यायचं नाही अशी परिस्थिती. मुलगा काहीतरी करुन दाखवेल हा विश्वास त्याच्या पालकांना होता आणि हाच विश्वास त्याने सार्थ करुन दाखवला. संसार पाठीवर टाकून आई-बाप मेंढरांकडे गेले की ही लेकरं भविष्याचे धडे गिरवण्यासाठी आजीच्या भरोशावर असायची.
कधी एकेकाळी परिस्थितीमुळे दुर्लक्षित झालेला तो आता मोठा अधिकारी झालाय. परिस्थितीची जाणीव, गरीबीचे चटके आणि वेळ बदलण्याची जिद्द ही त्रिसूत्री डोळ्यासमोर ठेवून त्याने अपार कष्ट केलं आणि त्याच्या कष्टाचं चीज झालं. विक्रांत अभ्यासात तर हुशार होताच पण त्यासोबतच त्याला खेळातही रस आहे. काहीच दिवसांपूर्वी त्याला क्रिडा क्षेत्रातील मानाच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांच्यावतीने पुरस्कार देवून त्याला गौरवण्यात आलं आहे.
या अगोदरही त्याला काठमांडूमध्ये झालेल्या साऊथ आशियाई पॅरा कब्बडीमध्ये गोल्ड मेडल तसंच थाळी फेक आणि पॅरा पावर लिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडलने सन्मानित करण्यात आलं आहे. खेळ असो किंवा मग स्पर्धा परीक्षा विक्रमने नेहमीच संधीचं सोनं केलं. आव्हानं स्वीकारत नवी उमेद निर्माण केली.
सामाजिक कार्याची आवड असलेला विक्रम आता शासकीय सेवेत रुजू होतोय. पण हा निकाल आपल्या आई वडिलांना भेटून सांगण्याचं भाग्य काही त्याला लाभलं नाही. कारण आताही त्याचे आई-वडील घर, गाव सोडून दुसऱ्या जिल्ह्यात मेंढरं घेवून गेलेत. पण मुलाच्या या यशाने नक्कीच शेंडगे कुटुंबाचे दिवस बदलतील. आई वडिलांचं कष्ट थांबून आता सुखाचे दिवस त्यांना देण्याचं उघड्या डोळ्यांनी बघितलेलं स्वप्न आता नक्कीच पूर्ण होईल. विक्रम तुझ्या या जिद्दीला 'माझा' चा सलाम.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
