Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांची 370 कलम रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका, राम मंदिर ट्रस्ट निर्मितीमध्ये योगदान, निवडणूक आयोगातील वर्षपूर्तीपूर्वीच बढती
Gyanesh Kumar : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात 20 राज्यांच्या निवडणुका पार पडतील.

नवी दिल्ली : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांचा केंद्रीय निवडणूक आयोगातील कार्यकाळाला एक वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना बढती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मावळते मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या जागी ज्ञानेश कुमार काम पाहतील.
ज्ञानेश कुमार कोण आहेत?
ज्ञानेश कुमार हे 1988 च्या केरळ केडरचे आयएएस अधिकारी आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशचे असून निवृत्तीनंतर त्यांना 14 मार्च 2024 ला लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून घेण्यात आलं होतं. ज्ञानेश कुमार यांनी 14 मार्चला पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 मार्चला लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या.
ज्ञानेश कुमार हे जानेवारी 2024 मध्ये सहकार मंत्रालयाचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले होते. संसदीय कामकाज विभागाचे सचिव, गृह खात्याचे सह सचिव आणि अतिरिक्त सचिव म्हणून ज्ञानेश कुमार यांनी काम केलं आहे. याशिवाय त्यांनी केरळमध्ये कार्यरत असताना विविध विभागांमध्ये काम केलं आहे. सार्वजनिक बांधकाम आणि वित्त विभागाचं कामकाज पाहिलं आहे.
2018 ते 2021 मध्ये ज्ञानेश कुमार यांनी 370 कलम हटवण्यामध्ये आणि जम्मू काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेत महत्त्वाचं योगदान दिलं होतं. नरेंद्र मोदी यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जातात. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या निर्मितीत देखील त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं होतं. याशिवाय ज्ञानेश कुमार यांनी मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी कायदा 2023 निर्मितीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं होतं. सहकार क्षेत्रातील पारदर्शकता वाढवण्यासाठी हे योगदान देण्यात आलं होतं.
ज्ञानेश कुमार यांनी गेल्या 11 महिन्यात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू यांच्यासह लोकसभा निवडणूक, त्यानंतर जम्मू काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड आणि नवी दिल्लीच्या निवडणुकांच्या आयोजनात सहभाग घेतला होता.
ज्ञानेश कुमार यांना कार्यकाळ 26 जानेवारी 2029 रोजी संपणार आहे. या काळात 20 विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुका देखील होती. 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते निवृत्त होतील.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबा :राहुल गांधी
मुख्य निवडणूक आयुक्त समितीचे सदस्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला सुप्रीम कोर्टाचा मुख्य निवडणूक आयुक्त निवडी संदर्भातील निर्णय येईपर्यंत थांबण्याची विनंती केली होती. सुप्रीम कोर्टाचा निर्णय बुधवारी येणार आहे.
इतर बातम्या :
Gyanesh Kumar New Election Commissioner Of India : ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

