ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
परभणतील सुस्साट सुटलेल्या ट्रक अपघताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले तसेच अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले आहे

मुंबई : राज्यातील अपघाताच्या (Accident) घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीत. दररोजच अपघाताच्या घटनांमध्ये काहींना आपला जीव गमवावा लागल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. आजही परभणी, शिर्डी आणि वर्ध्यात तीन ठिकाणी वेगवेगळे अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 1 ठार आणि 6 जण जखमी झाले असून परभणीतील अपघात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची माहिती आहे. परभणी (Parbhani) गंगाखेड महामार्गावरील महेश जिनिंग मिल समोर उसाचे बेणे घेऊन जाणाऱ्या ट्रकने 3 दुचाकींना उडवल्याने झालेल्या अपघातात 1 जण ठार व तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर संतप्त जमावाने ट्रकला आग लावली. ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुसरीकडे वर्ध्यात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट घरातच शिरला. सुदैवाने येथे कुणीही जखमी झालं नाही, पण ट्रकने पेट घेतल्याने ट्रक जळून खाक झाला आहे.
परभणतील सुस्साट सुटलेल्या ट्रक अपघताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले तसेच अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाला शांत केले आणि वाहतूक पूर्ववत केली. मात्र, अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर तिघे जखमी झाल्याने संतप्त जमावाने ट्रक पेटवला. दरम्यान, अपघातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ट्रकला लागलेली आगही विझवण्यात आली आहे. सध्या ट्रकचालक फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
वर्ध्यात ट्रक अनियंत्रित होऊन घरात शिरला
वर्ध्यातील सिंदी मेघे परिसरात असलेल्या नागठाणा शिवारात महामार्गावर धावणारा ट्रक अचानक अनियंत्रित झाला. ट्रक रस्त्याच्या कडेला बाहेर जात बाजूच्या घरातच शिराल्याची धक्कादायक घटना घडली. भरधाव असलेल्या या ट्रकने अचानक पेट घेतला असून ट्रकला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. किराणा माल भरून असलेला हा ट्रक मोठ्या प्रमाणात जळाल्याने ट्रकचे अतोनात नुकसान झाले आहे. सुदैवाने ट्रकमधील चालक व क्लिनर बचावला आहे. नागपूरवरुन कर्नाटक येथील हुबळी येथे हा ट्रक माल घेऊन निघाला होता, तेव्हा नागपूर-तुळजापूर मार्गावर ही भीषण घटना घडली आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, तिघे जखमी
शिर्डीजवळील समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. कोपरगाव शिवारातील शिर्डी टोल नाक्याजवळ अपघातात चार चाकी वाहनाचे मोठं नुकसान झालं आहे. अवजड वाहनाला मागून धडक दिल्याने चारचाकी कारचं मोठ नुकसान झाल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. अपघातात कारमधील मयंक लोहिया, त्यांची पत्नी आणि आठ महिन्यांची चिमुकली जखमी झाली आहे. अपघातानंतर तत्काळ जखमींना उपचारासाठी शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, कारला धडक देणारे अवजड वाहन मात्र घटनास्थळावरून फरार झालं आहे.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
