Manikrao Kokate : कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली, 2 तासातच जामीन; मंत्री माणिकराव कोकाटेंची खुर्ची थोडक्यात वाचली?
Manikrao Kokate : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला नाशिक न्यायालयाने दोन वर्षाचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

Manikrao Kokate : राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) व त्यांचे भाऊ सुनील कोकाटे (Sunil Kokate) यांना मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तावेज देऊन लाटल्याच्या प्रकरणात प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik Court) सुनावली आहे. या निकालाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी व मंत्रिपद देखील धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र आता, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अवघ्या दोन तासात जामीन मंजूर झालाय.
माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर तातडीने सुनावणी झाली. या सुनावणीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झाला आहे. 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका उपलब्ध केली जाते. त्यासाठी संबंधिताला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी 1995 मध्ये अशी कागदपत्रे सादर करून शहरातील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्हू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या. इतकेच नव्हे तर, या इमारतीतील अन्य दोन सदनिका इतरांनी मिळवल्या. त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरु होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. मात्र इतर दोन जणांच्या बाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाची शिक्षेची तरतूद केलेली नाही. मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि 50 हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. मात्र, आता माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झाला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
