Prayagraj Kumbh Mela: कुंभमेळ्यात भाविकांनी ज्या पाण्यात आंघोळ केली, त्या पाण्यात विष्ठेतील जिवाणू, खळबळ उडवणारा अहवाल
Prayagraj Kumbh Mela: महाकुंभमेळ्याता आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी स्नान केले आहे. 144 वर्षांतून एकदा येणारी ही पर्वणी साधण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशभरातील हिंदूधर्मीयांच्या श्रद्धेचे केंद्र ठरत असलेल्या प्रयागराजमधील गंगा नदीच्या पाण्याविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रयागराज येथे गंगा आणि यमुना नदीच्या संगमावर गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यवधी लोकांनी महाकुंभात पवित्र स्नान केले आहे. मात्र, या पाण्यात मोठ्याप्रमाणात विष्ठेत असणारे जिवाणू (एफसी) आढळल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) दिली आहे. सीपीसीबीने हा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) मुख्य खंडपीठासमोर सादर केला. या अहवालामुळे एकच खळबळ उडाली आहे.
भाविक जिथे स्नान करत आहेत, त्या सर्व ठिकाणच्या पाण्याचे नमुने 12 आणि 13 जानेवारीला जमा करण्यात आले होते. त्यामध्ये फेकल कॉलिफॉर्म हे मानवी प्राण्याच्या विष्ठेत असणारे जिवाणू सापडले आहेत. संगमाच्या वरील भागातून स्नानासाठी ताजे पाणी सोडले जाते. तरीही याठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड आहे. काही भाविकांकडून नदीच्या किनाऱ्यावर कचरा आणि विष्ठा केल्याचेही प्रकार समोर आले होते. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळेच गंगा आणि यमुना नदीच्या पाण्यात प्रदूषण होऊन जिवाणूंचे प्रमाण वाढल्याचा अंदाज आहे.
तब्बल 144 वर्षांनी एकदा येणाऱ्या महाकुंभचा पवित्र मुहूर्त साधत गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास तीन कोटी भाविकांनी प्रयागराजमध्ये स्नान केले आहे. इतक्या प्रचंड संख्येने लोक नदीत स्नान करत असल्याने गंगेच्या पाण्यात एफसीचे प्रमाण वाढल्याचे संबंधित अहवालात म्हटले आहे. महाकुंभदरम्यान शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सगळ्याची तपासणी राष्ट्रीय हरित लवादाकडून केली जात आहे.
अलीकडेच राष्ट्रीय पर्यावरण अभियांयत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) शास्त्रज्ञांनी गंगा नदीच्या पाण्यात स्वत:ला स्वच्छ ठेवण्याची गुणवत्ता असल्याचा दावा केला होता. गंगेच्या पाण्यात मोठ्याप्रमाणावर बॅक्टेरियोफेज असल्यामुळे ते गंगेचे पाणी शुद्ध ठेवतात आणि प्रदूषण होण्यापासून रोखतात, असे या शास्त्रज्ञांनी म्हटले होते. मात्र, आता केंद्रीय प्रदूषण मंडळाने गंगा आणि यमुना नदीच्या पाण्यात मोठ्याप्रमाणावर विषाणू असल्याचा दावा केल्याने 'नीरी'च्या शास्त्रज्ञांचा दावा कितपत खरा मानायचा याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी दावा फेटाळला
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय प्रदूषण मंडळाचा अहवाल फेटाळला आहे. गंगा आणि यमुना नदीचे पाणी स्नान आणि आचमन करण्यासाठी योग्य असल्याचा दावा त्यांनी विधानसभेत बोलताना केला. उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ सातत्याने गंगा नदीतील पाण्याच्या गुणवत्तेवर बोट ठेवून आहे, असेही त्यांनी म्हटले.
आठ महिन्याच्या चंद्रा नावाच्या गाईने कुंभमेळ्यात स्नान केले
उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे महा कुंभमेळ्याचा आयोजन करण्यात आलेला आहे. या महा कुंभमेळामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी देशभरातून शिवभक्त त्या कुंभमेळा मध्ये सहभागी होत असतात. त्याप्रमाणेच हिंगोलीच्या सिताराम म्यानेवर यांनी सुद्धा या कुंभमेळ्याला जायचं ठरवलं. परंतु कुटुंबातील सदस्य प्रमाणे असलेली चंद्रा नावाची आठ महिन्याची गाय सोडून कसं जाणार? हा विचार आल्यानंतर म्यानेवर यांनी या चंद्रा नावाच्या गाईची वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तपासणी केली आणि या गाईला कुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी घेऊन नेले. जवळपास दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून या चंद्रा गाईला प्रयागराज येथे पवित्र संगमांमध्ये पवित्र स्नान घालण्यात आले. त्यानंतर त्या चंद्रा गाईला सिताराम म्यानेवर यांनी परत घरी घेऊन आले. अडीच हजार किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर सुद्धा चंद्रा कुठेही थकली नाही. चंद्रा कुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर आता अधिकच प्रसन्न झाल्याचे चंद्राचे मालक सिताराम म्यानेवर हे सांगत आहेत. स्वतःच्या आईप्रमाणे या गाईला सांभाळत असल्याचं म्यानेवर यांनी सांगितले.
आणखी वाचा

















