Maharashtra Kesari : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर बाळासाहेब लांडगेंचं वर्चस्व, रामदास तडस यांना कोर्टाचा धक्का
Maharashtra Kesari : न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर रामदास तडस आणि त्यांचे सहकारी धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागणार आहेत.

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर (Maharashtra Kustigir Parishad) नक्की कोणाचा अधिकार असेल यावरुन सुरु असलेल्या वादात न्यायालयाने बाळासाहेब लांडगेंच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे यावर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा (Maharashtra Kesari) आपणच भरवणार असल्याचं बाळासाहेब लांडगे यांनी म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय कुस्तीगीर संघाने शरद पवार अध्यक्ष आणि बाळासाहेब लांडगे सचिव असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त केली होती. त्यानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अस्तित्वात आली होती.
बाळासाहेब लांडगे सचिव असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला भारतीय कुस्तीगीर संघाने बरखास्त करताना जी प्रक्रिया करण्यात आली ती योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आता जरी हा निकाल बाळासाहेब लांडगे यांच्या बाजूने लागला असला तरी या वादाचे अनेक अंक आपल्याला न्यायालयात, धर्मादाय आयुक्तांकडे (Charity Commissioner) पाहायला मिळणार आहे.
पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे म्हणाले, न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर रामदास तडस आणि त्यांचे सहकारी धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागणार आहेत. बाळासाहेब लांडगे यांची संलग्न कुस्ती संघटना भारतीय कुस्तीगीर महासंघाने बरखास्त केली. त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा त्यांना अधिकार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या कुस्ती संघाचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे नवीन अस्तित्वात आलेली कुस्तीगीर परिषदच यावर्षीची महाराष्ट्र कुस्तीगीर स्पर्धा आयोजित करणार आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 20 ते 25 डिसेंबर दरम्यान आम्हीच भरवणार आहे.
दुसरीकडे न्यायालयाचा निकाल हा आपल्या बाजूने लागलेला आहे असे म्हणत बाळासाहेब लांडगेंनी पुढील महिन्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच आयोजनाची देखील तयारी सुरू केली आहे. या संदर्भात ते शुक्रवारी पत्रकार परिषद देखील घेणार आहेत.
कुस्तीगीर परिषदेकडून पुण्यात 20 ते 24 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र बाळासाहेब लांडगे यांनी या निर्णयाला न्यायालयाने आव्हान दिले होते आणि आपल्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करणं बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. न्यायालयाने लांडगे यांचा हा दावा उचलून धरलाय.
संबंधित बातम्या :
Maharashtra Kesari Pune: यंदा पुण्यात रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार; मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानला स्पर्धेचा मान
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
