छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्ल्यांना नामांकन, मंत्री शेलारांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पॅरिसला
Chhatrapati Shivaji Maharaj Forts : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्यांना (Forts) जागतिक वारसामध्ये नामांकन मिळाल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Forts : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्यांना (Forts) वर्ल्ड हेरिटेज (World Heritage) कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार (Minister Ashish Shelar) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे. आज वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांना शिष्टमंडळ भेटले. महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या विशाल यांच्यासह केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आपल्या राजे शिव छत्रपतींच्या 12 गड किल्ल्यांचे जागतिक वारसामध्ये नामांकन झाल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
गड किल्ल्यांना जागतिक वारसा मिळावा त्यासाठीचे सादरीकरण व यासंबंधित पुढील टप्प्यातील तयारीसाठी आज शिष्टमंडळासोबत आम्ही चर्चा केल्याची माहिती शेलार यांनी दिली. यावेळी शिष्टमंडळ सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन उपस्थित होत्या.
कोणत्या किल्ल्यांचा समावेश?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिस दौऱ्यावर आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. याबाबतचे सादरीकरण पुर्ण क्षमतेने प्रभावीपणे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ गेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांचा राज्य शासनाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोकडे पाठवला त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व सादरीकरणासाठी जाण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मंत्री एँड शेलार यांनी आभार मानले आहेत.
26फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारचं शिष्टमंडळ पॅरिसमध्ये
महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यांचे शिष्टमंडळ 22ते 26फेब्रुवारी, 2025 या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे गेले आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार करणार आहेत. इतर सदस्यांमध्ये अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळाच्या पॅरिस दौऱ्याद्वारे, या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या:
Mumbai: रायगड प्रतापगडासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांच्या 'या' प्रस्तावासाठी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ पॅरिस दौऱ्यावर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
