BLOG : प्रभादेवी आणि 'वडापाव'वाले सारंग!

प्रभादेवी… गगनचुंबी इमारतींची… नवश्रीमंतांपासून सेलिब्रिटींचीही हॅपनिंग प्लेस बनण्याआधी जणू एक गावच होतं. वाड्यावस्त्यांचं, बैठ्या आणि फार फार तर दुमजली चाळींचं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यातून आलेल्या कष्टकऱ्यांचं, तितकंच आंध्र आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या श्रमिक वर्गाचंही. कारण इथल्या गिरण्यांना हवा होता राबराब राबणारा मजूर. तो मजूर वर्ग कोकणातल्या गावागांमधून किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या साताऱ्यातून आपापली बिऱ्हाडं घेऊन स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच इथं स्थायिक झाला. त्या गिरणी कामगारांनी आपली गावं सोडली, पण सोबत आणलेली माणुसकी मुठीत घट्ट पकडून ठेवली. त्यामुळं खोली दहा बाय दहाची असली तरी काळजात मोठी जागा होती. मग काय पुढच्या पिढ्याही गावाकडनं मुंबैत येत राहिल्या आणि भांड्याला भांडं लागू न देता एकत्र नांदू लागल्या. त्या काळात इथल्या माणसांना इथल्याच माणसांचा मोठा आधार होता. पाटील-पटेल-भागवत-तळवडेकर किंवा सिंग आदी डॉक्टरांनी इंजेक्शनची सुई टोचली की, आमचे आजार पळून जायचे. त्यामुळं जगणं कसं सुसह्य आणि आनंदी होतं. गेल्या २५ वर्षांत प्रभादेवीत मोठा कायापालट झाला. वाड्या-वस्त्या-बैठ्या चाळी-एकदोन मजल्यांच्या चाळी सारं काही पुनर्विकासाच्या लाटेत वाहून गेलं. ऐशींच्या दशकात इथला गिरणगाव उन्मळून पडला आणि आता अख्खं गावच्या गाव हॅपनिंग प्लेसची कास धरू लागलंय. अहो, आमचा सोज्वळ सिद्धिविनायकही नवश्रीमंतांचा-सेलिब्रिटींचा प्रसिद्धिविनायक झाला, तिथं सर्वसामान्य कष्टकऱ्यांची आणि श्रमिक वर्गाची काय कथा?
पण पुनर्विकासाच्या या लाटेतही आमच्या प्रभादेवी गावातली माणुसकी टिकून होती. कारण मूळच्या या गिरणगावाला इतिहास आणि वारसाच मोठा लाभलाय. माहीम बेटाचा राजा बिंब यानं बांधलेलं बाराव्या शतकातलं प्रभावती मातेचं मंदिर इथं असल्यानं या परिसराची प्रभादेवी अशी स्वतंत्र ओळख आहे. एकीकडे परळ, एकीकडे दादर आणि एकीकडे वरळी अशा तीन परिसरांना चिकटून समुद्राच्या कुशीत प्रभादेवी वसलीय. परकीयांच्या आक्रमणात तोडण्यात आलेलं प्रभादेवीचं मंदिर अठराव्या शतकात पुन्हा बांधण्यात आलं. गेल्या तीनशेहून अधिक वर्षांचा इतिहास सांगणारं प्रभादेवी मातेचं मंदिर आजही इथल्या नागरिकांचं मूळ श्रद्धास्थान आहे. पण आडवी पसरलेली प्रभादेवी पुनर्विकासाच्या लाटेत आकाशाशी खेळू लागली आणि इथल्या माणुसकीचं नातं काहीसं हरवायला लागलंय. नवनव्या इमारतींची, तिथल्या रहिवाशांची, बहुराष्ट्रीय उद्योगसमूहांच्या कार्यालयांची आणि तिथल्या कर्मचाऱ्यांची गर्दी वाढली तसा त्या गर्दीत इथल्या माणुसकीचा जीव गुदमरू लागलाय.
प्रभादेवीकरांच्या सुदैवानं मागच्या पिढीतल्या काही मंडळींनी ती माणुसकी अजूनही घट्ट धरून ठेवलीय. ही मंडळी तुम्हाला अगदी रोज ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर भेटतील. त्या पिढीला भेटण्याचा, त्यांच्याकडून अगदी आजही मूळ प्रभादेवीच्या सोनेरी दिवसांच्या गोष्टी ऐकण्याचा आनंद काही औरच असतो. सुभाष सारंगना भेटलं ना, की तोच आनंद मिळायचा. सुभाष सारंग म्हणजे प्रभादेवीची खासियत असलेल्या सारंग बंधू वडापावचे मालक. प्रभादेवी मंदिरानजिकच्या मुरारी घाग मार्गावर, शिवसेना शाखा क्रमांक १९३ला लागूनच सारंग बंधू जवळपास ५५-५६ वर्ष श्रमिकांची भूक आणि खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवतायत. आता समोरच झालेलं आणि वजरी-खिमा-भेजा या रसरशीत पदार्थांसह अस्सल मालवणी पदार्थ खायला घालणारं सारंग मालवणी कट्टा हे छोटंसं उपाहारगृहही त्यांचंच.
सारंग बंधूंच्या या व्ववसायाचा आजवर हसतमुख चेहरा किंवा आजच्या भाषेत सांगायचं तर ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर होते ते म्हणजे सुभाष सारंग. गिरणीत राबून आणि व्यायामशाळेतल्या कसून गोटीबंद झालेल्या शरीराची जाणीव त्यांना पाहिलं की आजही व्हायची. दहा-बारा वर्षांपूर्वीचा हृदयविकार आणि पाच-सहा वर्षांपूर्वीचा कर्करोग यांना काखेत दाबूनच ते वडापावच्या धंद्यावर किंवा हॉटेलच्या गल्ल्यावर बसलेले असायचे. हो, असायचेच. या २९ जानेवारीला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह हा नायर रुग्णालयाला दान करण्यात आला. प्रभादेवीच्या महापालिका शाळेत जेमतेम सहावीपर्यंतचं शिक्षण झालेला हा माणूस जगाचा निरोप घेण्याआधीही विज्ञानयुगाशी नातं कसा जोडून जाऊ शकतो, या प्रश्नाचं उत्तर कदाचित आता आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी कदाचित प्रभादेवी आणि सुभाष सारंग यांच्या इतिहासाची पानं चाळायला लागतील.
प्रभादेवी नावाचा आणि इथल्या गिरणगावाचा इतिहास तसा आधीच सांगून झालाय, पण कष्टकऱ्यांच्या गावाला श्रीपाद अमृत डांगे, दत्ताजी साळवी, शंकरराव साळवी, गोविंदराव फणसेकर, भाऊराव पाटील, जया पाटील आदी विविध विचारसरणीच्या नेत्यांचा आणि वक्त्यांचा समृद्ध वारसा लाभलाय. प्रभादेवीची नाळ वारकरी पंथाशीही जुळलेली आहे. इथलं विठ्ठल मंदिर, इथली संताची चाळ म्हणजे आजची सदगुरु भावे महाराज सोसायटी यासह विविध ठिकाणी आषाढी एकादशीला दिंडीची आणि अखंड पारायणाच्या सप्ताहची किंवा भजन-कीर्तनाची परंपरा आजही आहे. त्यामुळं एका जमान्यात प्रभादेवीतल्या कित्येक पिढ्यांवर आध्यात्माचे संस्कार कळत नकळत झालेले असायचे. सुभाष सारंग यांच्यासारख्या सहावी शिकलेल्या कष्टकऱ्याच्या मुखातली भाषा ही त्या संस्कारांमधूनच घडायची आणि कानाला गोड लागायची. म्हणूनच त्यांच्या वडापावच्या धंद्यातलं निम्मं यश हे त्यांच्या गिऱ्हाईकांशी संवाद साधण्यातच होतं. तोंडात खडीसाखर आणि डोक्यावर बर्फ असला ना की तुम्हाला काहीही अडचण येणार नाही, हा त्यांचा पुढच्या पिढीला कानमंत्र असायचा. आयुष्यात अपमान सहन करता यायला हवा आणि आयुष्य सुंदर असतं, पण ते सजवायचं तुमच्या हातात असतं हेही त्यांचे युवापिढीला सल्ले असायचे. यंग प्रभादेवी क्रीडा मंडळ, मध्य प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव, प्रभादेवी मंदिर उत्सव समिती किंवा डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामात हिरीरीनं सहभागी होताना त्यांचं युवापिढीशी जवळचं नातं असायचं. त्यामुळं वयाच्या ६७व्या वर्षीही सुभाष सारंग हे विचारानं तरुण होते.
सुभाष सारंग सांगायचे की, त्यांनी त्यांचे काका जयराम सारंग यांच्याकडून व्यवसायाची दीक्षा घेतली. त्या काळात सारंग कुटुंबीयांचा उकडलेले चणे आणि मिरची भजी विकण्याचा धंदा होता. प्रभादेवी महापालिका शाळेत शिकणारा छोटा सुभाष त्या काळात खोका लावून धंद्यावर बसायचा. त्याची कष्ट करण्याची तयारी पाहून कुणीतरी त्याला कल्याणच्या कोळसेवाडीत वडापावच्या धंद्यावर नेलं. तिथूनच शाळा सुटली, पण सुभाष सारंग पहिल्यांदा बटाटावडा बनवायला शिकले आणि त्यांना चरितार्थाचं साधन मिळालं. पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेनं सारंग यांनी प्रभादेवीत काकांकडून धंद्याची सूत्रं आपल्या हाती घेतली आणि तिथूनच त्यांची भरभराटही सुरु झाली. त्या काळात १५ पैशांनी मिळणारा त्यांचा वडापाव आज १८-२० रुपयांवर पोहोचला आहे. पण या कालावधीत सुभाष सारंगांनी बटाटावडा, कांदाभजी किंवा ओल्यासुक्या चटण्यांच्या गुणवत्तेशी कधी तडजोड केली नाही. गिऱ्हाईकाला त्यानं मोजलेल्या पैशांत चांगली चव चाखायला मिळावी आणि त्याचं पोटही भरावं, हा त्यांचा प्रयत्न असायचा. काळ्या वाटाण्याची उसळ भरून केलेला पट्टी समोसा ही तर सारंग स्नॅक्सची सर्वात मोठी खासियत. काळ्या वाटण्याची उसळ घातलेला पट्टी समोसा हा शंभर टक्के मालवणी पद्धतीचा मेन्यू असल्याचं सारंग अभिमानानं सांगायचे. या समोशाच्या मान्यवर चाहत्यांची नावं सांगताना त्यांनी आधीची ऑर्डर कधी दिली होती, हेही त्यांना तोंडपाठ असायचं.
सुभाष सारंग यांनी वर्ष-दीड वर्षापासून आपलं लक्ष सारंग मालवणी कट्टा या आपल्या उपाहारगृहावर केंद्रित केलं होतं. कधी प्रभादेवी मंदिराच्या परिसरात गेलो की, सारंग अगदी आवर्जून हाक मारून बोलावून घ्यायचे. मस्त कुरकुरीत भजी खायला देऊन त्यावर कटिंग चहाचीही ऑर्डर द्यायचे. ते माझ्या वडिलांचे चाहते असल्यानं त्यांच्याविषयी आणि ६०-७०च्या दशकातल्या प्रभादेवीविषयी आणि राजकीय चळवळीविषयी बारीकसारीक माहिती द्यायचे. मग बोलता बोलता त्या आठवड्याभरात झालेल्या किमोथेरपीचा रेफरन्स यायचा. पण त्याचा त्रास त्यांच्या चेहऱ्यावर किंवा दैनंदिन व्यापात कधीच दिसायचा नाही. भरपूर काम, हसणं आणि आनंदी राहणं ही आपली त्रिसूत्री असल्याचं त्यांचं सांगणं असायचं.
यंदाची प्रभादेवी मंदिराची जत्रा संपली आणि सुभाष सारंगाची तब्येत ढासळायला लागली असं आता कुणी भेटलं की सांगतं. पण कामाच्या व्यापात त्यांच्या ढासळलेल्या तब्येतीची बातमी माझ्या कानावर आली नाही. २९ जानेवारीला संध्याकाळी पाचच्या सुमारास आला तो बहिणीचा व्हॉट्सअॅप मेसेज. सुभाष सारंग गेले. मेसेज वाचला आणि मनात डोकावलेला पहिला प्रश्न होता… आता जुन्या जमान्यातली प्रभादेवी, इथली संस्कृती, मालवणी खाद्यसंस्कृती आणि माझे बाबा राजाभाऊ साळवी यांच्या सामाजिक जाणीवेच्या गोष्टी कोण सांगणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
