रिपब्लिकन पक्ष असताना राज ठाकरेंची गरजच काय? आठवलेंचा सवाल, म्हणाले ते नसतानाही दणदणीत विजय मिळवला
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे नसूनही एवढा दणदणीत विजय मिळाला आहे. यावेळी रिपब्लिकन मतदारांची साथ कामी आल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केले.
Ramdas Athawale on Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंना (Raj Thackeray) सोबत घेतल्यास दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार महायुतीपासून लांब जातील असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलं. राज ठाकरेंवर या समाजाची मोठी नाराजी असल्याने याचा फटका महायुतीला बसेल असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे नसूनही एवढा दणदणीत विजय मिळाला आहे. यावेळी रिपब्लिकन मतदारांची साथ कामी आली आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्ष असताना राज ठाकरे यांची गरजच काय? असा सवाल करत रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना टोला लगावला. ते पंढरपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणे चुकीचे
रामदास आठवले हे आज सोलापूर (Solapur) दौऱ्यावर असताना ते पंढरपूरमध्ये थांबले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना जोरदार फटकेबाजी केली. रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत असताना राज ठाकरे यांची गरजच काय? असा टोला त्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) लगावला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत धनंजय मुंडे हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुठेही सहभागी असल्याचे दिसत नसल्याने त्यांचा राजीनामा मागणे चुकीचे आहे असं आठवले म्हणाले. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांचे संबंध चांगले असले तरी या खून प्रकरणात धनंजय मुंडे सामील नसल्याने त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार किंवा धनंजय मुंडे यांनाच घ्यावा लागेल, असे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने खेळवायला हवेत
माणिक कोकाटे यांच्याबाबत न्यायालयाने निर्णय दिला असला तरी त्यांना आपल्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. त्यामुळं त्यांना वरच्या कोर्टात न्याय मागण्याचा कोकाटे यांना अधिकार आहे असे सांगत कोकाटे यांचीही आठवले यांनी पाठराखण केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने खेळवायला हवेत असेही आठवले म्हणाले. पूर्वी त्याला विरोध होता मात्र आता तसा विरोध राहिलेला नाही. आज दुबईत खेळला जाणारा सामना भारत जिंकणार आहे. भविष्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकमेकांच्या देशात सामने खेळले जायला पाहिजेत असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या:
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य























