Sharad Pawar : कम्प्लिट कोल्हापुरी 'पवार.'... शरद पवार जेव्हा जेव्हा कोल्हापुरात येतात, तेव्हा तेव्हा रमतात; शरद पवारांचे कोल्हापूरवर एवढं प्रेम का?
Sharad Pawar On Kolhapur : कोल्हापूर म्हणजे शरद पवारांचे आजोळ. शरद पवारांच्या आई शारदाबाई पवार या शाहू महाराजांच्या पुरोगामी जिल्ह्यामध्ये वाढलेल्या. त्यांचा प्रभाव शरद पवारांच्या राजकारणावर दिसतोय.
कोल्हापूर: माझी आई कोल्हापूरची, कोल्हापूरच्या मातेच्या पोटी जन्माला येण्याचं मला भाग्य मिळालं... हे वक्तव्य आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं. कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात ही कोल्हापूरपासून (Sharad Pawar Kolhapur Speech) करण्याची शरद पवारांची परंपरा. कोल्हापूर ही शौर्याची नगरी, स्वाभिमानाची नगरी असल्याचं पवारांनी सातत्याने त्यांच्या भाषणातून सांगितलंय. त्यामुळेच की काय कोणत्याही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा ही कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारापासून केली जाते.
आई शारदाबाई पवार कोल्हापूरच्या
शरद पवार आणि कोल्हापूर हे संबंध काही नवीन नाहीत, शरद पवारांना घडवणाऱ्या त्यांच्या आई शारदाबाई पवार (Sharadabai Pawar) या मूळच्या कोल्हापूरच्या. त्यामुळे शरद पवारांना कोल्हापूरविषयी राजकारणापलिकडचं प्रेम. शरद पवारांच्या आई शारदाबाई पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1912 रोजी कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यात गोलिवडे या गावी झाला. जन्मच शाहूंच्या कोल्हापुरातील (Kolhapur Shahu Maharaj) असल्याने लहानपणापासूनच त्यांचा ओढा हा समाजकारणाकडे.
पुढे मूळचे साताऱ्याचे असलेले पण बारातमतीत स्थायिक गोविंदराव पवार (Govindrao Pawar) यांच्याशी त्यांचं लग्न झालं. शारदाबाई पवार या 1938 साली पुण्याच्या लोकल बोर्डात निवडून आल्या आणि पुढे त्यांनी 14 वर्षे यामध्ये काम केलं. आपण केवळ सात दिवसांचे असताना आपल्या आईने लोकल बोर्डाच्या मिटिंगला नेल्याचं शरद पवार त्यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्रात सांगतात.
काही वर्षांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर असताना शरद पवार हे त्यांच्या आजोळी म्हणजे गोलिवडे या ठिकाणी गेले होते. त्यावेळी मिश्किल टिप्पणी करताना ते म्हणाले होते की, मामाच्या गावची मुलगी करण्याची इच्छा अपुरी राहिली.
शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा
कोल्हापूर नगरी ही पुरोगामी नगरी असून या नगरीने देशाला दिशा दाखवल्याचं शरद पवार म्हणतात. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात जे कार्य केले ते आजच्या राज्यकर्त्यांसाठी आदर्शवत असंच आहे. शाहू महाराजांनी जाती आणि धर्माच्या पलिकडे जाऊन शिक्षण, शेती, आरोग्य आणि सर्वच क्षेत्रात अत्यंत भरीव असं कार्य केलं. शरद पवार आपल्या भाषणात वारंवार याचा दाखला देतात. शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनाही मोठी मदत केली. बाबासाहेबांच्या शेतीविषयक विचारांमध्ये किंवा पाण्यासंबंधी धोरणांवर शाहू महाराजांचा प्रभाव असण्याची शक्यता आहे असं एकदा शरद पवारांनी म्हटलं होतं.
शरद पवारांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द ज्या विचारांवर उभी आहे त्यावर शाहू महाराजांच्या कार्याचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच शरद पवारांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम आहे. त्यामुळेच शरद पवार कोल्हापुरातील राजकारणावरही स्वतः बारकाईने लक्ष ठेऊन असतात.
शरद पवारांच्या भगिनी कोल्हापूरच्या
शरद पवार यांच्या भगिणी सरोज पवार या शेतकरी कामगार पक्षाचे लढवय्ये नेते एन डी पाटील ( Dr. N D Patil) यांच्या पत्नी. शरद पवारांच्या आई शारदाबाईंचे आपल्या पुत्राप्रमाणेच जावयावरही प्रेम. शरद पवार यांचे राजकारण आणि एन डी पाटील यांचे राजकारण एकदम विरोधी टोकाचे. एनडी पाटील हे शेकापचे कट्टर तर शरद पवार हे काँग्रेस विचारधारेचे. या दोघांच्या राजकारणाची सुरूवातच एकमेकांच्या विरोधातून झाली. पण यांना जोडणारा एकमेव दुवा म्हणजे पुरोगामी विचार. त्यामुळेच राजकारणात या दोघांच्या भूमिका काहीही असल्या तरी त्यांनी नातेसंबंधात राजकारण कधीही आणल्याचं दिसत नाही.
लोकसभेचा पहिला उमेदवार कोल्हापुरातील
शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर त्यांना कोल्हापुरातून मोठा पाठिंबा मिळाला. त्यावेळचे नेते सदाशिवराव मंडलिक आणि निवेदिता माने यांनी शरद पवारांची साथ दिली. तसेच या जिल्ह्यातून अनेक नेत्यांनीही साथ दिली अन् त्या नेत्यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचं काम हे कोल्हापुरातील जनतेने केलं. त्यामुळे शरद पवारांकडून लोकसभेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करताना पहिलं नाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवाराचे (Kolhapur Loksabha Election) घोषित केलं जायचं.
मिरज दंगलीवेळी हसन मुश्रीफांचा उल्लेख
सन 2008-09 सालच्या दरम्यान सांगलीतील मिरज या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगल उसळली. त्याचा परिणाम शेजारच्या कोल्हापूरवरही झाला. त्या वर्षी झालेल्या दंगलीत कोल्हापुरात पहिल्यांदाच भाजपचे आमदार निवडून आले. आजूबाजूच्या सांगली आणि बेळगाव परिसरातही काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. पण कागलमधून हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) आपली आमदारकी कायम ठेवली. त्यावेळी राज्यातील विधानसभा निवडणुकीतील चांगली गोष्ट काय असा शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले होते की, एवढ्या मोठ्या दंगलीनंतरही राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात हसन मुश्रीफ निवडून आले ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे.
हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील शरद पवारांचे विश्वासू नेते... त्यांना काम करण्याची पूर्ण मोकळीकता. पण मधल्या काळात हसन मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत मुश्रीफांनी अजित पवारांसोबत भाजपसोबत जाणं पसंद केलं आणि स्वतःला ईडीच्या रडारपासून तात्पुरतं का असेना बाजूला केलं. त्यावर शरद पवारांनी कोल्हापुरात येऊन त्यांच्यावर जाहीर टीका केली.
एकंदरीत शरद पवार म्हणजे कप्लिट कोल्हापुरी... आणि विषय एकदम हार्ड. शरद पवार ज्या ज्या वेळी कोल्हापुरात येतात त्या त्या वेळी ते त्यांच्या आठवणीत रमतात.
ही बातमी वाचा: