Sanjay Shirsat : लाडकी बहिणसाठी 4000 कोटी, एकूण 7 हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला; मंत्री संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Sanjay Shirsat : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील निधीवर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

Sanjay Shirsat : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी अजित पवारांकडून आपल्या मंत्र्यांसाठी बजेटमध्ये हात ढिला सोडण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडील मंत्र्यांच्या खात्यांना निधीमध्ये कट लावण्यात आल्याने महायुतीतील (Mahayuti) अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील निधीवर शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Faction) मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, लाडकी बहीण योजना चांगली आहे. त्यासाठी पैसे दिले पाहजे. यात दुमत नाही. विकासाची कामे कमी केले, हरकत नाही. मात्र माझा आक्षेप आहे की सामाजिक न्याय व आदिवासी खात्याला घटनेच्या तरतुदीनुसार पैसे द्यावे लागत आहे. यात कट करता येत नाही. लाडकी बहीणसाठी चार हजार कोटी, पंतप्रधान आवास योजनेसाठी 1500 कोटी, ऊर्जा विभागासाठी 1400 कोटी, असा एकूण सात हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला आहे.
अशा पद्धतीने कट मारल्यास उद्रेक होईल
हा विभाग मागास लोकांना प्रवाहात आणण्यासाठी आहे. मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांनी या खात्याला कट लावला तर कामे कसे होतील? यासाठी तरतूद करून द्या, असे माझे मत आहे. सामाजिक न्याय विभाग हा सर्व सामान्य, दलित, वंचितांसाठीचा विभाग आहे. त्याच विभागाला कट लावला तर या समाजाच्या कल्याणाचे काय होणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तर अशा पद्धतीने कट मारल्यास उद्रेक होईल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
पैसे कपात करू नये
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचे पैसे कपात करू नये, यासाठी मी मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांना पत्र लिहून मागणी करणार आहे. माझ्या खात्यातून पैसे घेताना संमती घेतली पाहिजे होती. संमती मागितली असती तर मला देता आली नसती. हे बंधन आम्हाला कायद्याने दिले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
नफरतची निशाणी हटवा
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. ही कबर उद्ध्वस्त करण्याची मागणी आता जोर धरत आहे. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, आमच्या पक्षाची भूमिका हीच आहे की, औरंगजेबची कबर येथे नको. कशासाठी पाहिजे? तो त्रास आम्हाला कशाला पाहिजे. एक राजा तिकडून येतो, इथल्या हिंदूंचे मंदिरं पाडतो, महिला भगिनींवर बलात्कार करतो, अनेक लोकांना छळतो, छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस हालहाल करून मारतो, त्याची आठवण आम्हाला कशाला पाहिजे? औरंगजेबची काढून फेकून द्या, नफरतची निशाणी हटवा, असे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
