Suresh Dhas : खोक्या भाईच्या घरावर वनखात्याने बुलडोझर चालवला, सुरेश धसांना राहवलं नाही, म्हणाले, 'कुणाचं घर पाडणं चांगली गोष्ट नव्हे'
Suresh Dhas : सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वनखात्याने बुलडोझर चालवला आहे. आता यावर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Suresh Dhas : भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्याचे अनेक गुन्हेगारी व्हिडिओ समोर आल्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्याला प्रयागराज येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. राज्याच्या वनविभागानं ही कारवाई केली. खोक्यानं वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन घर बांधल्याचा दावा केला आहे. खोक्या गुन्हेगार आहे म्हणून नव्हे तर त्यानं वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन घर बांधल्याचं सरकारनं म्हटलं आहे. वनखात्याच्या जागेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या घरावर बुलडोझर चालवण्यात आल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सतीश भोसले याच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हावी. पण आमचे घर पाडणाऱ्यांवरही सरकारने कारवाई करावी. सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी सतीश भोसले हिच्या बहिणीने केली आहे. यानंतर आता सुरेश धस यांनी देखील कुणाचं घर पाडणं चांगली गोष्ट नव्हे, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
सुरेश धस म्हणाले की, मी आता तिथे चाललो आहे. मी वन खात्याच्या काही लोकांना बोलावलं आहे, त्यांच्याशी मी बोलतो. कोणाचे घर पाडणे ही चांगली गोष्ट नाही. ती ॲक्शन का घेण्यात आली? हे सुद्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मी बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले.
विकास बनसोडे प्रकरणात लवकरात लवकर गुन्हा दाखल होईल
बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे एका ट्रक मालक क्षीरसागर याने चालक विकास बनसोडे याला दोन दिवस डांबून ठेवत मारहाण केली. यात त्या चालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात आष्टी पोलिसांनी ट्रक मालकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत विचारले असता सुरेश धस म्हणाले की, हत्या प्रकरणात लवकरात लवकर गुन्हा दाखल होईल. आरोपी पोलिसांनी उचलला आहे. आरोपीला अटक केली आहे, असे त्यांनी म्हटले.
नागरगोजे शिक्षकाने आत्महत्या केली हे दुर्दैवी
बीडमधील धनंजय अभिमान नागरगोजे या 30 वर्षीय शिक्षकाने बँकेच्या बाहेर फाशी घेऊन, स्वत:ची जीवनयात्रा संपवली. याबाबत विचारले असता सुरेश धस म्हणाले की, नागरगोजे शिक्षकाने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. ही बातमी वाचल्यानंतर मन हेलावून गेले. ज्यांची नाव त्यात समोर आली आहेत, त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.
कृष्णा आंधळेबाबत काय म्हणाले सुरेश धस?
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला तीन महिने उलटले आहेत. मात्र अद्याप या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. याबाबत विचारले असता कृष्णा आंधळे सापडेल. त्याचं बरं वाईट कोण कशाला करेल? सापडला काय आणि नाही सापडला काय? असं काही फरक पडत नाही. त्याला प्रॉब्लेम आहे तो स्वतःच लपला आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

