18 वर्षापासून पगार नाही, घर चालवायचे कसे? फेसबूक पोस्ट करत बीडमध्ये शिक्षकानं संपवलं जीवन
Teacher commits suicide : बीडच्या केळगाव येथील विनाअनुदानित आश्रम शाळेतील एका शिक्षकाने आत्महत्या (Teacher suicide) केल्याची घटना घडली आहे.

बीड : बीडच्या केळगाव येथील विनाअनुदानित आश्रम शाळेतील एका शिक्षकाने आत्महत्या (Teacher suicide) केल्याची घटना घडली आहे. गेल्या 18 वर्षापासून त्याना पगार न मिळाल्यामुळे त्याची आर्थिक स्थिती खालावली होती, याच विवंचनेतून फेसबुक पोस्ट (Facebook post) करत शिक्षकाने आत्महत्या केली आहे. वर्षानुवर्षे त्याला त्याच्या कामाचा मोबदला दिला जात नाही, मग त्याने घर चालवायचे कसे? असा प्रश्न शिक्षकापुढे होता, यातूनच त्याने आपले जीवन संपवले आहे. धनंजय नागरगोजे (Dhananjay Nagargoje) असं या शिक्षकाचे नाव आहे.
शिक्षक हा समाज व्यवस्थेचा कणा मानला जातो. मात्र विनाअनुदानित शाळांमुळे शिक्षकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न नेहमीच चर्चिला जातो. त्यातच ज्या संस्थेवर हा शिक्षक काम करत असतो त्या संस्थाचालकाकडून पगार नसतानाही वेठ बिगारीप्रमाणं कामे करुन घेतली जातात. वर्षानुवर्षे त्याला त्याच्या कामाचा मोबदला दिला जात नाही मग त्याने घर चालवायचे कसे? असा प्रश्न निर्माण होतो. याच विवंचनेतून बीड जिल्ह्यातील एका विना अनुदानित शाळेतील शिक्षकाने फेसबुक पोस्ट करत आपले जीवन संपवले आहे.
भावनिक फेसबूक पोस्ट करत आत्महत्या
धनंजय नागरगोजे हे बीडच्या केळगाव येथील आश्रम शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. गेल्या 18 वर्षापासून ते या शाळेत काम करत होते. मात्र, 18 वर्षापासून त्यांना पगार न मिळाल्यामुळं त्यांची आर्थिक हालत खालावली होती. अखेर धनंजय याने बीडमधील कृष्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेजवळ गळफास घेत आपले जीवन संपवले. या आधी त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत आपल्या चिमुकल्या मुलीची माफी देखील मागितली होती. ही फेसबुक पोस्ट सविस्तरपणे त्याने लिहिले होती. श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर, मी माफी मागायच्या लायकीचा नाही. तुला अजून कळत नाही तुझं वय किती आहे. ज्याला कळायला पाहिजे होते त्याला तुझा बापू कळाला नाही अशा आशयाची ही भावनिक पोस्ट होती.
फेसबूक पोस्टमध्ये धनंजय नागरगोजे यांनी सहा नावे देखील स्पष्ट लिहिली आहेत. त्यामध्ये विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे त्याचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा छळ केल्याचे सांगण्यात आले आहे. इतकेच नाही तर मला हे हाल हाल करुन मारतील. याचं कारण फक्त एकच सांगितलं की मी तुमच्या शाळेवर गेल्या 18 वर्षे झालं नोकरी करतोय, तुम्ही मला अजून पगार का दिला नाही. विक्रम मुंडे यांनी तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण असं देखील या पोस्टमध्ये लिहिलं आहे. संस्थाचालकांच्या मुजोरीनंतर धनंजय नागरगोजे याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. हेच लोक माझ्या मृत्यूला कारण असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आंदोलनातून शिक्षकांना फक्त नैराश्यच मिळाले
तीन महिन्यापूर्वी, संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळं अख्खा महाराष्ट्र हादरला होता. आता पुन्हा अशाच एका प्रकरणामुळं बीड जिल्हा हादरला आहे. 6 फेब्रुवारीपासून 26 फेब्रुवारी पर्यंत विनाअनुदानित शिक्षकांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केलं होतं. मात्र, आंदोलनातून शिक्षकांना फक्त नैराश्यच मिळाले. मुंबईतल्या आंदोलनाची सरकारने नोंद घ्यावी अशी आंदोलकांची इच्छा असते. मात्र ते आंदोलकांना आलेल्या पावलांनीच वापस जावे लागते. किमान मुख्यमंत्र्यांनी तरी अधिवेशनात काहीतरी सांगावं बीडमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी सडून टाकलेली सिस्टम आधी बदलली पाहिजे असे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
धनंजय नागरगोजे यांना त्रास देणाऱ्या शिक्षकावर कारवाई करा
धनंजय नागरगोजे यांना त्रास देणाऱ्या शिक्षकावर कारवाई करा आणि बिना अनुदानित शाळेतील शिक्षकांचे प्रश्न सोडवा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विनाअनुदानित शाळा कृती समितीचे बीड जिल्हाध्यक्ष आत्माराम व्हावळ यांनी तशी मागणी केली आहे. धनंजय नागरगोजे यांनी लिहिलेली पोस्ट वाचून डोळ्यामध्ये पाणी येते. त्यामुळं 18 वर्षे काम करुन पगार मिळत नसेल तर कुटुंबाचे स्वप्न कसे पूर्ण करावेत? याच विवंचनेत अनेक शिक्षकही आहेत. अनुदानाचा प्रश्न मार्गी लावून शिक्षकांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा आणखी काही शिक्षक असं पाऊल उचलण्याची भीती देखील आत्माराम व्हावळ यांनी व्यक्त केलीय.
राज्यात गेल्या 30 वर्षापासून निवासी आश्रम शाळेच्या शिक्षकांचा प्रश्न प्रलंबित
राज्यात गेल्या 30 वर्षापासून निवासी आश्रम शाळेच्या शिक्षकांचा प्रश्न प्रलंबित आहे. पगार न मिळाल्यामुळं धनंजय नागरगोजे सारख्या शिक्षकाला फेसबुक पोस्ट लिहित आपला जीव गमावा लागतो. इतकच नाहीतर यात तीन वर्षाच्या मुलीची या पोस्टमध्ये माफी देखील मागतो. 18 वर्षे जर शिक्षकाची पगार होत नसेल आणि त्याला त्याकरता आपला जीव द्यावा लागत असेल तर याबाबत सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. इतकच नाही तर धनंजय नागरगोजे याला न्यायदेखील मिळाला पाहिजे.
महत्वाच्या बातम्या:
Buldhana : पुरस्कार मिळाला पण न्याय नाही! आदर्श युवा शेतकरी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याची होळी दिवशीच आत्महत्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

