Sindhudurg News : रक्षकच भक्षक! महिलांची छेड काढणाऱ्या पोलिसांना जमावाकडून चोप; 5 जणांना अटक, दोघांचं निलंबन
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड येथून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. यात देवगडमध्ये पर्यटनासाठी आलेले वसईतील सहा जणांच्या ग्रुपने युवतीचा विनयभंग (Crime) तसेच छेड काढण्याचा प्रयत्न केलाय.
Sindhudurg News सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात देवगडमध्ये पर्यटनासाठी आलेले वसईतील सहा जणांच्या ग्रुपने युवतीचा विनयभंग (Crime News) तसेच छेड काढण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी जमावाने त्यांना यथेच्छ चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यात सहापैकी चार जण तर चक्क जनतेचे रक्षकच असल्याचे समोर आले आहे. प्रकरणातील चारजण हे पोलीस (Police) सेवेतील होते. दरम्यान त्यातील दोघांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून रक्षकच भक्षक झाले कि काय? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.
रक्षकच झाले भक्षक? ग्रामस्थांचा संताप
पोलीस शिपाई हरिराम गिते आणि प्रवीण रानडे या दोघांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. रक्षण करणारे जर अश्या पद्धतीने कृत्य करत असतील तर जनतेचे रक्षण करणार कोण? असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित होतो आहे. मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) सुहास बावचे यांनी या प्रकरणी विनयभंग करणारे पोलीस शिपाई हरिराम गिते आणि प्रवीण रानडे या दोघांना सेवेतून निलंबित केले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनिमय 1951 च्या कलम 25 अन्वये प्राप्त अधिकारानुसार आणि मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम 1956 मधील नियम 3 च्या पोटनियम 1 च्या खंड (अ-२) (१- अ) (एक) (दोन) अन्वये आल्याची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
5 जणांना अटक, दोघांचं निलंबन
मिळालेल्या माहितीनुसार, हरिराम गिते, प्रवीण रानडे, माधव केंद्रे, श्याम गिते, शंकर गिते, सतवा केंद्रे हे देवगडमध्ये पर्यटनासाठी आले असता त्यांनी हे कृत्य केलं होत. दरम्यान, यातील 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींपैकी दोन वसई वाहतूक शाखेतील पोलीस आहेत तर एक जण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) आणि एक जण राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दलात कार्यरत आहे.
15 दिवसांची न्यायालयीन कोठडी
कॉलेज मधून घरी परतणाऱ्या युवतीची या पर्यटकांकडून छेडछाड आणि विनयभंग केल्याप्रकरणी सहा संशयित आरोपींना देवगड पोलिसांनी दिवाणी व्यायालयात हजर केले. मात्र यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. सर्व संशयित आरोपींना यावेळी चालत न्यायालयापर्यंत नेण्यात यावे, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. त्यामुळे देवगड मध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे या सहा जणांपैकी चौघेजण हे पोलीस सेवेत आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. पोलिसांनी ग्रामस्थांना समजविल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य केलं. आरोपीना व्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी संशयित आरोपींना सुनावली आहे.
हे ही वाचा