Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
Prashant Kishor : प्रशांत किशोर हे देशातील त्यांच्या शक्तिशाली राजकीय प्रचारासाठी ओळखले जातात. त्यामुळे टीव्हीकेच्या रोडमॅपला पीके मार्गदर्शन करत असल्याचे मानले जात आहे.

चेन्नई : दक्षिणेकडील तामिळनाडूत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. उत्तरेत बिहारमध्ये 'जन सूरज' हा नवा राजकीय पक्ष स्थापन करूनही अजूनही डाळ न शिजलेल्या निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि तामिळनाडूमध्ये 'तमिलगा वेत्री कळघम' या राजकीय पक्षाची स्थापना करणारा सुपरस्टार विजय एकाच मंचावर दिसल्याने राजकीय भूवया उंचावल्या. दोघांना एकत्र पाहिल्यावर विविध प्रकारचे राजकीय अंदाज बांधले जात आहेत. अभिनेता-नेता आणि तमिलगा वेत्री कळघम (TVK) प्रमुख विजय यांच्या पक्षाची स्थापना होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. दरम्यान, विजय यांनी महाबलीपुरममध्ये एका भव्य सभेचे आयोजन केले होते. तामिळनाडूमध्ये 2026 च्या निवडणुकीपूर्वी हे मोठे राजकीय प्रदर्शन मानले जात आहे. निवडणूक रणनीतीकार आणि जन सूरजचे प्रमुख प्रशांत किशोर (पीके) हे देखील यावेळी मंचावर दिसले.
कदाचित मी धोनीपेक्षा जास्त लोकप्रिय होईन!
TVK च्या वर्धापनदिनानिमित्त प्रशांत किशोर यांची उपस्थिती ही सुविचारित निवडणूक रणनीती दर्शवते. प्रशांत किशोर हे देशातील त्यांच्या शक्तिशाली राजकीय प्रचारासाठी ओळखले जातात. त्यामुळे टीव्हीकेच्या रोडमॅपला पीके मार्गदर्शन करत असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकारणाकडे मोर्चा वळवलेल्या प्रशांत किशोरांना स्वत:ला मात्र अजूनही बिहारमध्ये अस्तित्व दाखवता आलेलं नाही. त्यांचा अजूनही संघर्ष सुरुच आहे. यावेळी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, तमिळनाडूत माझ्यापेक्षा धोनी अधिक लोकप्रिय आहे. तथापि, टीव्हीकेला पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यास मदत केल्यास कदाचित मी धोनीपेक्षा जास्त लोकप्रिय होईन.
'गुप्त युती'चा आरोप
महाबलीपुरममध्ये झालेल्या या बैठकीत विजय यांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे नाव न घेता दोघांवर 'गुप्त युती' आणि तामिळनाडूच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. यादरम्यान विजयने #GetOut लिहिलेल्या साइनबोर्डवर स्वाक्षरी केली. यामुळे DAK आणि भारतीय जनता पक्षाने नुकत्याच चालवलेल्या मोहिमांकडे लक्ष वेधले. DMK ने #GetOutModi मोहीम सुरू केली होती, तर भाजपने #GetOutStalin मोहिमेचे नेतृत्व केले होते.
एमजीआर आणि जयललिता यांची तुलना
सुपरस्टार विजयच्या राजकारणात पाऊल ठेवण्याची तुलना तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन (एमजीआर) आणि जे जयललिता यांच्याशी केली जात आहे. तथापि, राज्याचा इतिहास सावधगिरीच्या उदाहरणांनी भरलेला आहे. शिवाजी गणेशन, विजयकांत आणि कमल हसन यांना त्यांच्या स्टार पॉवरचे स्थायी राजकीय यशात रूपांतर करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्याचवेळी रजनीकांत यांनी स्वतः नकार दिल्याचे सांगण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या


















