मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी कुटुंबियांनी केलेल्या अनेक मागण्यापैकी ही एक मुख्य मागणी मान्य झाल्याने देशमुखांच्या कुटुंबियांनी आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी समाधान समाधान व्यक्त केलं

पुणे : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी मस्साजोगचे ग्रामस्थ आणि आमदार सुरेश धस यांनी केली होती. तर, मुख्यमंत्र्यांनी देखील फोनवरुन उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद साधला होता. अखेर, देशमुख कुटुंबीय (Santosh Deshmukh) गावकऱ्यांसह अन्नत्याग आंदोलनास बसल्यानंतर निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर काही राजकीय टीकात्मक प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. आता, निकम यांनी या नियुक्तीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कुटुंबियांनी या संदर्भात केलेल्या अनेक मागण्यापैकी ही एक मुख्य मागणी मान्य झाल्याने देशमुखांच्या कुटुंबियांनी आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं असले तरी इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्यत्याग आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे ग्रामस्थ, स्थानिक आमदार सुरेस धस यांनी सतत माझ्या नावाची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मला विचारणा केली. मा, काल मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्यागाच्या आंदोलनाला बसणं मला योग्य वाटलं नाही. म्हणून, मी काल मुख्यमंत्र्यांना कळवलं मी खटला चालवायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली. उज्ज्वल निकम यांची मस्साजोग हत्याप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्यानंतर प्रथमच त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी, राजकारण आणि वकील या दोन्ही वेगळ्या बाबी असून राजकीय टीकेची मला गंमत वाटते, असेही निकम यांनी म्हटले.
राजकीय टीकेची मला गंमत वाटते
सरपंच देशमुख हत्याप्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या प्रकरणात माझा सहभाग सुरू होईल. गावकरी देशमुख कुटुंब यांनी सतत माझ्या नावाची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती. ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्यानंतर रात्री मी मुख्यमंत्र्यांना कळवलं की, या प्रकरणात मी सरकारी वकील म्हणून काम करायला तयार आहे. याप्रकरणी, माझ्यावर करण्यात येणाऱ्या राजकीय टिकेची मला गंमत वाटते, एका निवडणुकीत मी लढलो आणि राजकीय परिपक्वता नसलेले लोक माझ्यावर टीका करत आहेत. गावकऱ्यांना मी आवाहन करतोय तुम्ही काळजी करू नका, मी आहे असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटलं.
पोपटगिरी करणाऱ्यांनी मी भीक घालत नाही
न्यायासाठी मी लढणारा आहे, हे महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या जनतेला माहीत आहे. पोपटगिरी करणाऱ्या लोकांना पोपटगिरी करू द्या, त्यांना मी भीक घालत नाही. देशमुख कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन करू नये. राजकीय लोकांच्या चिथावणीकडे लक्ष देऊ नका, असे आवाहनही निकम यांनी देशमुख कुटुंबीयांना केले आहे.























