IPL लिलावात 'अनसोल्ड' राहिलेल्या 'लॉर्ड शार्दुल'चं नशीब चमकले! अचानक मागच्या दरवाजाने मारली एन्ट्री
आयपीएल 2025 चा थरार 22 मार्चपासून सुरू झाला आहे. या हंगामात आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला गेला आहे.

Shardul Thakur Replacement for Mohsin Khan IPL 2025 : आयपीएल 2025 चा थरार 22 मार्चपासून सुरू झाला आहे. या हंगामात आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला गेला आहे. पण एका संघाला त्यांच्या संघात बदल करावे लागले आहेत. खरंतर, लखनौ सुपर जायंट्सचा एक स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर गेला आहे. लखनौ सुपर जायंट्सने लिलावापूर्वी या खेळाडूला कायम ठेवले होते. अशा परिस्थितीत, एलएसजीला त्यांच्या संघात एका नवीन खेळाडूचा समावेश करावा लागला आहे. बीसीसीआयनेही या बदलीला मान्यता दिली आहे.
लखनौ सुपर जायंट्समध्ये मोठा बदल
लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मोहसीन खान गुडघ्याच्या लिगामेंटच्या दुखापतीने त्रस्त आहे. या दुखापतीमुळे तो गेल्या तीन महिन्यांपासून कोणताही क्रिकेट सामना खेळला नाही. त्याच वेळी, लखनौ सुपर जायंट्सच्या सराव शिबिरात गोलंदाजी करताना त्याच्या पायाच्या स्नायूंनाही दुखापत झाली. अशा परिस्थितीत तो आयपीएल 2025 च्या हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी, एलएसजीने मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरचा समावेश केला आहे, जो लिलावात अनसोल्ड राहिला होता.
आयपीएलने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, 'लखनौ सुपर जायंट्सने डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खानच्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश केला आहे, जो दुखापतीमुळे टाटा इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामातून बाहेर पडला आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडू ठाकूरला 2 कोटी रुपयांच्या किंमतीवर करारबद्ध करण्यात आले आहे. भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या ठाकूरकडे आयपीएलचा मौल्यवान अनुभव आहे, त्याने पाच फ्रँचायझींसाठी 95 सामने खेळले आहेत.
शार्दुल ठाकूरसाठी मोठी संधी
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात शार्दुल ठाकूरला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. पण लखनौ सुपर जायंट्सने त्याला मोठी संधी दिली आहे. तो गेल्या काही दिवसांपासून लखनौ संघाशी जोडला आहे, त्यामुळे तो कधीही संघात येऊ शकतो असे मानले जात होते. लखनौचे आणखी दोन गोलंदाज आहेत ज्यांना हंगामातून बाहेर पडण्याचा धोका आहे. मयंक यादव आणि आकाश दीप हे देखील अद्याप संघात सामील झालेले नाहीत. हे खेळाडू सध्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहेत.
आयपीएलमधील शार्दुलची कामगिरी
शार्दुल यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघांचा भाग होता. आतापर्यंत त्याने या लीगमध्ये 95 सामन्यांमध्ये 94 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 9.23 आहे. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी 36 धावांत 4 बळी ही आहे. याशिवाय, त्याने 138.92 च्या स्ट्राईक रेटने 307 धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

