Swarget Depo Crime: स्वारगेट अत्याचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, पुण्यातील 'त्या' बड्या अधिकाऱ्यांची बदली
Swarget Depo Crime: राज्य परिवहन महामंडळाचे पुणे प्रदेशाचे व्यवस्थापक व पुणे विभागाचे नियंत्रक यांची तडकाफडकी बदली केली.

पुणे: पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये (Pune Swarget Bus Depo Crime) एका 26 वर्षांच्या तरूणीवरती अत्याचार झाल्याची घटना घडली होती, त्या घटनेचे विधिमंडळात देखील पडसाद उमटले आहेत. या घटनेप्रकरणी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बदलीची कारवाई केली आहे. त्यात राज्य परिवहन महामंडळाचे पुणे प्रदेशाचे व्यवस्थापक व पुणे विभागाचे नियंत्रक यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.
एसटी प्रशासनाने स्वारगेट अत्याचार प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. घटनेनंतर काही दिवसांतच आगार व्यवस्थापक 'जयेश पाटील, कनिष्ठ आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील व स्थानकप्रमुख मोहिनी ढेरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रकसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यावरती देखील बदलीची कारवाई केली आहे. पुण्याच्या प्रादेशिक व्यवस्थापक अनघा बारटक्के यांची बदली नागपूरला करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नागपूरमधील श्रीकांत गभणे यांची नियुक्ती केली आहे.
पुण्याचे विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांची नाशिकच्या विभाग नियंत्रकपदी नियुक्ती केली; तर नाशिक विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांची पुण्याला बदली केली आहे. सिया मंगळवारी पदभार स्वीकारणार आहेत. तसेच, पुणे विभागाचे यंत्र अभियंता पंकज ढावरे यांची अकोल्याला बदली केली. त्यांच्या जागी दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेतील अधीक्षक स्मिता कुलकर्णी यांची नियुक्ती केली. पुणे विभागाचे वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी गिरीश यादव यांची मुंबईला त्याच पदावर बदली झाली. पुण्याचे सुरक्षा निरीक्षक शंकर लादे यांच्याकडे गिरीश यादव यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.
बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे
1) अनघा शैलेश बारटक्के, प्रादेशिक व्यवस्थापक
2) श्रीकांत मुधकरराव गभणे, प्रादेशिक व्यवस्थापक
3) प्रमोद संभाजी नेहूल, विभाग नियंत्रक
4) अरुण भगतसिंग सिया, विभाग नियंत्रक
5) पंकज गेणू ढावरे, यंत्र अभियंता
6) स्मिता सुरेश कुलकर्णी, अधिक्षक
7) गिरिश वसंतराव यादव, वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी
काय आहे प्रकरण?
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर डेपोमध्येच (Pune Swarget Bus Depo Crime) असलेल्या शिवशाही बसमध्ये 25 फेब्रुवारीच्या पहाटे बलात्काराची घटना घडली होती. पुण्यामधून फलटणच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या तरुणीवर बलात्कार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

