Devendra Fadnavis : नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा मेगाप्लॅन, योगी आदित्यनाथांची 'ती' गोष्ट हेरली, महत्त्वाचा निर्णय घेतला
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे आज रविवारी (दि. 23) नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. तसेच कुशावर्त तिर्थाची पाहणी देखील केली. मुख्यमंत्र्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Nashik Kumbh Mela 2027) तयारीचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्यासाठी अॅक्शन प्लॅन सांगितला आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा कायदा तयार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज त्र्यंबकेश्वरला जाऊन दर्शन घेतले. परिसराची पाहणी केली. त्र्यंबकेश्वरचा विकास आरायखडा तयार केला आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा विकास झाला पाहिजे. देशभरातील लोक तिथे येतात. कॉरिडॉर तयार करणे, पार्किंग, शौचालय तयार करणे, तिथले मंदिरं आणि कुंडाची दुरूस्ती करणे. गे ब्रह्मगिरी परिसरात नॅचरल ट्रेल्स तयार करायच्या आहेत. एसटीपीचे जाळे तयार करून पाणी शुद्ध राहिले पाहिजे, या दृष्टीने एक आराखडा तयार करण्यात आला आहे. कुठल्याही परिस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी त्याचे काम पूर्ण करायचे, असा प्रयत्न केला जाणार आहे. या कामाला खूप मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. पण आम्ही राज्य सरकार म्हणून निर्णय घेतलाय की, याला कुठल्याही निधीची कमतरता पडू द्यायची नाही. त्यामुळे कामांसाठी आवश्यक निधी आम्ही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा कायदा तयार करणार
त्र्यंबकच्या साधू संतांनी अशी मागणी केली आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच कुंभमेळ्याची जबाबदारी घ्यावी, असे विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहेच. पण, आपण आता उत्तर प्रदेशने ज्याप्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि कुंभमेळा प्राधिकरण तयार केलं. त्याच धर्तीवर आपण देखील कायदा तयार करत आहोत. आपणही कुंभमेळा प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर चौकट देत आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
कुशावर्त तिर्थाबाबत मुख्यमंत्र्यांचं भाष्य
कुशावर्त तिर्थाची पाहणी करून आपण तेथील पाण्याबाबत नाराजी व्यक्त केली. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील काळातच मी काही तज्ञांची टीम तिथे पाठवली होती. त्यांनी आम्हाला याबाबत उपाययोजना सांगितलेल्या आहेत. त्यांनी ज्या काही उपाययोजना सांगितल्या आहेत, त्यावर आम्ही निर्णय करत आहोत. त्यांचा असा दावा आहे की तेथील पाणी ते स्वच्छ करू शकतात. त्यामुळे त्यातला जो उत्तम पर्याय असेल तो आम्ही स्वीकारून तत्काळ कार्यवाही करू, असे त्यांनी म्हटले.
साधू-महंतांच्या 'त्या' मागणीवर काय म्हणाले फडणवीस?
काही साधू महंतांनी नाशिक कुंभमेळा असा उल्लेख होत असल्याने या कुंभमेळ्याचा उल्लेख नाशिक-त्र्यंबक कुंभमेळा असा करावा, अशी मागणी केली. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिक आणि त्र्यंबक अशा दोन्ही ठिकाणी हा कुंभमेळा होतो. आपण नाशिक या करीता म्हणतो की, नाशिक लोकांना अधिक माहिती आहे. पण त्र्यंबकेश्वरचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघेही एकत्र असलेले शिवलिंग त्र्यंबकेश्वरला आहे. म्हणून आपल्या संपूर्ण अध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्र्यंबकेश्वरचा दर्जा अत्यंत वर आहे. त्यामुळे त्यांनी जी काही मागणी केली आहे ती मागणी आम्ही मागणी करू, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
