बाळा मी इथेच आहे; पुस्तक प्रकाशनावेळी आईचा आवाज ऐकताच मुख्यमंत्री शिंदेंच्या डोळ्यात पाणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित, त्यांच्या राजकीय वाटचालाची माहिती देणाऱ्या ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचे अनावरण झाले.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे संवेदनशील नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. मात्र, राज्याच्या राजकारणात त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मोठी उलथापालथ झाल्याचं देशाने पाहिलं. त्यामुळे, कणखर आणि डॅशिंग नेता म्हणूनही त्यांनी ओळख निर्माण झाली आहे. एक रिक्षावाला ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री (Chief minister) हा त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आणि संघर्षाची कहाणी आहे. आयुष्याच्या वळणावर जीवनात आलेल्या अनेक संकटांना मात करत, संकटांची ढाल बनवत त्यांनी राजकीय क्षेत्रात स्वत:चं कर्तृत्व सिद्ध केलंय. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज डॉ. प्रदीप ढवळे यांनी लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचे प्रकाशन ठाण्यातील सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या आईंच्या (Mother) आठवणीने भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित, त्यांच्या राजकीय वाटचालाची माहिती देणाऱ्या ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचे अनावरण झाले. या कार्यक्रमासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही आणि पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. त्यांचे वडिल, मुलगा, सून आणि नातूही या कार्यक्रमात होते. येथील व्यासपीठावर तीन फोटो लावण्यात आले होते. त्यामध्ये, दिवंग बाळासाहेब ठाकरे, दिवंगत आनंद दिघे आणि त्यांच्या मातोश्री स्व. गंगूबाई शिंदे यांच्या प्रतिमा पूजनीय होत्या. यावेळी, पुस्तक प्रकाशनानंतर व्यासपीठावर त्यांच्या मातोश्रींची एक चित्रफित दाखवण्यात आली. ही चित्रफित पाहिल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं दिसून आलं.
मी आज जरी या कार्यक्रमस्थळी शरीराने नसले तरी तू स्वत:ला एकटं समजू नकोस. तुझ्या प्रेमापोटी किती मोठ-मोठी मंडळी आज इथं आलीय. आज मला आठवण येतेय, ती आनंद दिघे साहेबांची. तुझ्या डोळ्यातील अश्रू मला दिसायंत, मी इथेच आहे, असं या चित्रफितीतील आवाज येतो अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे डोळे पाणावतात. यावेळी, सभागृह देखील भावूक झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, डॉ. प्रदीप ढवळ यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संघर्ष आणि दिवंगत आनंद दिघेंच्या आठवणीही जागवल्या आहेत.
एकनाथ शिंदे होणे सोपे नाही - ढवळे
या मंगलमय सोहळ्याला पंढरीचा वास येतोय, चरित्र नायक आम्ही अनेक वर्षाने पाहतोय. जेव्हा प्रकाशन करायचे ठरले, तेव्हा उद्योगमंत्री माझ्यापाठी होते. खरतर त्यांचा हा उद्योग नव्हता, इतकी सर्व मोठी माणसं आपल्या मागे आहेत, हे भाग्य आहे. मी शिंदे साहेबांना जवळून पाहिलंय, आनंद दिघे साहेब यांच्या काळापासून दिघे साहेबांचे काम म्हणजे 4 महिने ऍडमिशनच सुरू असायचे. एकनाथ शिंदे होणे सोपे नाही, दादा इथे आहेत, दादांचा उल्लेख केला आहे मी या पुस्तकात. फडणवीस देखील आहेत, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे सोपे नाही मित्रानो. दिवसा जो स्वप्न पाहतो त्याचे, स्वप्न खरे होतात, असे म्हणत लेखक ढवळे यांनी एकनाथ शिंदेंचा परिचय करुन दिला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
