Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
Guillain Barre Syndrome: सध्या 16 गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत.
Guillain Barre Syndrome पुणे: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome Pune) या आजाराने चिंता वाढवली आहे. गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची संख्या शंभरच्या पार गेली आहे. आठवड्याभरातच पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या 101 वर पोहचली आहे. यामधील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक ही आहे.
सध्या 16 गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. महत्त्वाचे म्हणजे पुण्यात एकाच दिवसांत 28 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून 25 हजार 578 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी 68 पुरुष आणि 33 महिला आहेत.
गुलेन बॅरी सिंड्रोममुळे राज्यातला पहिला मृत्यू-
गुलेन बॅरी सिंड्रोममुळे 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गुलेन बॅरी सिंड्रोममुळे झालेला हा राज्यातला पहिला मृत्यू आहे. पुण्यातील धायरी परिसरात वास्तव्याला असणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीला गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मोठी घोषणा-
'गुलियन बॅरी सिंड्रोम' (जीबीएस) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 'महात्मा फुले जनआरोग्य योजने' अंतर्गत या आजाराच्या उपचारासाठी असलेल्या दरांच्या मयदित दुपटीने वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही योजना असलेल्या खासगी रुग्णालयांना योजनेकडून 80 हजार रुपये दिले जात होते. ती आता दुप्पट करत एक लाख 60 हजार करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना असलेल्या रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. 24) हा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
काय काळजी घ्यावी?
- पाणी उकळून व गाळून प्यावे.
- उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
- अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
जीबीएसच्या संसर्गाची कारणे-
- दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जीबीएसचा संसर्ग होऊ शकतो.
- संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
- काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
- याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.