Chandrapur News: 19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
Chandrapur News : जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा मोरक्या अजित राजगोंड याला राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
चंद्रपूर : जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा मोरक्या अजित राजगोंड याला राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. मध्यप्रदेशातील या बहेलिया टोळीने 2013 ते 2015 दरम्यान विदर्भात किमान 19 वाघांच्या शिकारी केल्याचा संशय वनविभाग आणि पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या शिकारींच्या मागे अजित आणि त्याचे दोन भाऊ केरू आणि कुट्टू हे प्रमुख सूत्रधार असल्याचे ही पुढे आले आहे. वाइल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने 2015 मध्ये अजितला तिरुपती येथून अटक केली होती. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून अजितला शिक्षा ही दिली होती. मात्र अलीकडेच सप्टेंबर 2024 मध्ये अजित हा जामिनावर जेल बाहेर आला होता. मात्र अजित सारखा कुख्यात तस्कर अचानक राजुरा तालुक्यात सापडल्याने वनविभागाच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.
चंद्रपुरात सापडल्याने वनखात्याचं टेन्शन वाढलं
मात्र अजित या भागात गेल्या किती दिवसांपासून आहे? त्याने या भागात वाघांच्या शिकार केलीय का? त्याच्या टोळीचे आणखी किती लोकं या भागात आहे? यासारखे अनेक प्रश्न आता निर्माण झाले असून वन विभागाचं विशेष पथक आता अजितची कसून चौकशी करत आहे.
4 पैकी 2 बिबट्यांची H5N1 अर्थात बर्डफ्लूची लागण
चंद्रपूर येथील ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटर मधील 4 पैकी 2 बिबट्यांची H5N1 अर्थात बर्ड फ्लू ची "सिरो" टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ऍनिमल डिसीसेसचा अहवाल प्राप्त झाल्याने ही बाब उघड झाली आहे. नागपूर येथील गोरेवाडा येथे 4 वाघांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू झाल्यानंतर चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथील प्राण्यांची देखील चाचणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्या पूर्वी मृत पावलेल्या 4 गिधाडांची देखील बर्ड फ्लू टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या 4 गिधाडांचा चंद्रपूर जिल्ह्यात मृत्यू झाला होता. तर मृत पावलेल्या सर्व गिधाड्यांना याच ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे आणून पोस्टमार्टम करण्यात आले होते.
त्यानंतर याच ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मधून 3 वाघ 11 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला शिफ्ट करण्यात आले होते आणि याच 3 वाघांचा डिसेंबर महिन्याच्या 20 ते 23 तारखे दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे बर्ड फ्लूची लागण झालेल्या गिधाडांमुळेच चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मध्ये ठेवलेले 3 वाघ संक्रमित झाले आणि नंतर त्यांचा नागपूरच्या गोरेवाडा मध्ये मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय आता व्यक्त केला जातोय.