Kolhapur News : हाच खरा प्रजासत्ताक!, विधवांनाही विवाहित आणि सौभाग्यवतींप्रमाणेच सन्मान, कोल्हापुरातील ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव
Kolhapur News : विशेष म्हणजे ग्रामसभा संपल्यानंतर विधवा महिलांना हळदीकुंकू लावून ग्रामपंचायतीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा सुरुवात करण्यात आली.
कोल्हापूर : गावातील विधवा स्त्रियांना विवाहित आणि सौभाग्यवती असलेल्या महिलेप्रमाणेच मानसन्मान देण्याचा (Widows should be respected like married) ऐतिहासिक निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील अंबप गावाने घेतला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अंबप गावात झालेल्या ग्रामसभेत हा एकमुखी ठराव करण्यात आला. अंबप गावच्या सरपंच दीप्ती माने यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा समजला होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या या भूमीतून जो संदेश दिला जातो तो संदेश देशपातळीवर पोहोचतो, असे नेहमी म्हटले जाते. त्यामुळे विधवांना सन्मान देण्याचा निर्णय कौतुकास्पद मानला जात आहे.
विधवा महिलांना हळदीकुंकू लावून ग्रामपंचायतीच्या निर्णयाची अंमलबजावणी
अकस्मात पतीचा मृत्यू झाल्यानंतर विधवा झालेल्या महिलेचे सौभाग्य अलंकार काढून घेतले जाणार नाहीत. तसेच हळदी कुंकू सारख्या सामाजिक कार्यक्रमात पूर्वी सारखाच मानसन्मान देण्याचा निर्णय या सभेत झाला. या सभेसाठी गावातील विधवा महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या विधवा महिलांनी ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करून समाधान व्यक्त केलं. विशेष म्हणजे ग्रामसभा संपल्यानंतर विधवा महिलांना हळदीकुंकू लावून ग्रामपंचायतीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा सुरुवात करण्यात आली. गावानेच मान देण्याचा निर्णय घेतल्याने यावेळी अनेक विधवा महिलांना अश्रू आवरले नाहीत. अंबप गावाने आज घेतलेल्या या ऐतिहासिक आणि चांगल्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होताना दिसत आहे.
विधवा महिलांसाठी हळदी कुंकू
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील मलकापूरमध्येही विधवा महिलांसाठी कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला. रुढी-परंपरांना फाटा देत विधवा महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मलकापूरच्या 'राजाई महिला मंडळा'कडून मलकापूरमधील नरहर मंदिरात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम पार पडला. प्रथा परंपरांच्या नावाखाली विधवा महिलांना वेगळी वागणूक दिली जाते. या प्रथांना फाटा देत विधवा म्हणून समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या 130 महिलांचा राजाई महिला मंडळातर्फे हळदी कुंकवाने मान देऊन सन्मान करण्यात आला. विधवा म्हणून आयुष्य जगत असताना येणाऱ्या वेदना अनेकींना माहीत असल्याने या स्तुत्य उपक्रमाने अनेक महिला भारावून गेल्या. यावेळी अनेक महिलांना अश्रू अनावर झाले.
इतर महत्वाच्या बातम्या