Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
Samruddhi Mahamarg : डोनगाव परिसरात समृद्धीलगत असलेल्या शेतातील हॉटेलवर मद्य विक्री होत असल्याने समृद्धी महामार्गावर पुन्हा वाहनांच्या अवैधरित्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.
बुलढाणा : समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सुरु झाल्यापासूनच या महामार्गावर अपघातांची (Accident) मालिका सुरु आहे. आता एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. डोनगाव (Dongaon) परिसरात समृद्धीलगत असलेल्या शेतातील हॉटेलवर मद्य विक्री होत असल्याने समृद्धी महामार्गावर पुन्हा वाहनांच्या अवैधरित्या रांगा (Illegal Parking) लागल्याचे पाहायला मिळत आहे. अवैध पार्किंगमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तर समृद्धी महामार्गावर मोटार सायकलचा वावर दिसून आला आहे. प्रशासन यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
समृद्धी महामार्ग हा एक्सप्रेस वे असून हा महामार्ग "एक्सेस कंट्रोल" म्हणून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहनांची वेग मर्यादा ताशी 120 किमी आहे. या महामार्गावरून वाहने नेहमीच वेगाने चालत असतात. तर महामार्गावर कुठेही अवैधरित्या वाहने थांबविण्यास बंदी आहे.
अवैध पार्किंगमुळे अपघाताचा धोका
तरीही समृद्धी महामार्गावरील मेहकरजवळ (Mehkar) डोनगाव शिवारात शेतातील हॉटेलवर अवैधरीत्या मद्य विक्री होत असल्याने या परिसरात पुन्हा एकदा वाहनांच्या रांगा बघायला मिळत आहे. महामार्गावर अवैधरित्या थांबलेल्या या वाहनांमुळे मात्र अपघाताचा धोका वाढला आहे. तर अनेकदा महामार्गालगत शेती असणारे शेतकरी समृद्धी महामार्गावरून दुचाकी घेऊन सुसाट दिसत आहेत.
समृद्धीवर पुन्हा अपघात
दरम्यान, शनिवारी (दि. 25) समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक व कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात (Samruddhi Mahamarg Accident) एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. ही घटना तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चॅनल क्रमांक 131 वर पुण्याहून नागपूरकडे जाणारी कार अचानक समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात कार चालक मंदार नातू (रा. पिंपरी चिचवड, पुणे), नीळकंठ चाबरेकर आणि सुनील धडस (केळगाव) हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने वाहन हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. गंभीर जखमींना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या