(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पोलिसांना खात्यांतर्गतच 20 लाखापर्यंतचं कर्ज! ठाकरेंकडून बंद केलेली योजना फडणवीसांकडून सुरु
Maharashtra Police DG loan scheme : आता कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गतच कर्ज मिळणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एबीपी माझाला याबाबतची माहिती दिली.
Maharashtra Police DG loan scheme : मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारकडून गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) मोठं गिफ्ट दिलं आहे. आता कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गतच 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एबीपी माझाला याबाबतची माहिती दिली. यापूर्वी ठाकरे सरकारने DG लोन (DG loan) ही सुविधा बंद केली होती. ती आता फडणवीसांनी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने फडणवीसांनी ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय बदलला आहे.
DG लोन खात्यासाठी जेवढा निधी आवश्यक होता, तो निधी देण्यात आला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यानुसार आता पोलिसांना 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज खात्यांतर्गतच मिळणार आहे. यापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने पोलिसांना 15 लाखात घरं देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ही कर्ज सुविधा सुरु केल्याने, पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे.
DG लोन योजना नेमकी काय?
DG लोन ही महाराष्ट्र पोलीस दलातील एक महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेनुसार कॉन्स्टेबलपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना खात्यामार्फतच सहज 20 लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध केलं जातं. संजय पांडे ज्यावेळी महाराष्ट्र सरकारचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते, त्यावेळी ठाकरे सरकारने ही योजना थांबवली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्र्यांचा कारभार आल्यानंतर त्यांनी या योजनेची पुन्हा माहिती घेऊन ती पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांना 15 लाखात घरं
यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांच्या घरांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना नाममात्र दरात घरं देण्यात येणार आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकासात (BDD Chawl Redevelopment) पोलिसांना 15 लाख रुपयांमध्ये घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. यापूर्वी पोलिसांच्या घरांच्या किमतीवरुन ठाकरे सरकारवर तत्कालिन विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली होती.
पोलिसांच्या घरांबाबत शासन निर्णय जारी
बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाखात घर मिळणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासात (BDD Chawl Redevelopment) पोलिसांना 15 लाख रुपयांमध्ये घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली होती.
संबंधित बातम्या
BDD Chawl : बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाख रुपयात घरं मिळणार, शासन निर्णय जारी