Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Nashik Guardian Minister : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या पालकमंत्रिबाबत मोठं वक्तव्य केलंय.

Nashik Guardian Minister : 18 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रिपदांची घोषणा केली होती. नाशिक जिल्ह्यासाठी भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रायगडमध्ये अजित पवार गटाच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचे समर्थक थेट मुंबई-गोवा महामार्गावर उतरले. त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, टायर जाळून रस्ता अडवला. तर नाशिकमध्ये देखील मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर अवघ्या एक दिवसातच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. नाशिक आणि रायगड दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही कायम आहे. नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपकडे राहणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या पालकमंत्रिबाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज रविवारी (दि . 23) नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तर कुशावर्त तीर्थ परिसराची देखील त्यांनी पाहणी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा देखील घेतला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे नाशिक शहरातील युवा उद्योजकांसोबत चर्चा सत्रात सहभागी झाले.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
या चर्चासत्रात देवेंद्र फडणवीस यांना युवा उद्योजकांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या तिढ्याबाबत प्रश्न विचारला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. जोपर्यंत जिल्ह्याला पालकमंत्री जाहीर होत नाही, तोपर्यंत चार्ज मुख्यमंत्र्यांकडे असतो. पण लवकरच नाशिकचे पालकमंत्री जाहीर करू, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे आता महायुतीच्या तिढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच नाशिकचे पालकमंत्रिपद ठेवणार का? अशा चर्चा रंगत आहेत.
फडणवीसांनी घेतला कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की, उत्तर प्रदेशने ज्याप्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि कुंभमेळा प्राधिकरण तयार केलं. त्याच धर्तीवर आपण देखील कायदा तयार करत आहोत. आपणही कुंभमेळा प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर चौकट देत आहोत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा विकास झाला पाहिजे. राज्य सरकार म्हणून आम्ही कुठल्याही निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

