सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टला सुशांत सिंह राजपूतचे कुटुंबीय आव्हान देऊ शकतात का? काय सांगतो नियम?
Sushant Singh Rajput Death Case : सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती असं सांगत त्याच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणात तिला क्लीन चिट दिली आहे.

Sushant Singh Rajput Case : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली नसून ती आत्महत्याच होती असं सांगत सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. एम्सच्या टीमनेही त्यांच्या अहवालात सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आत्महत्या मानलं होतं. आता प्रश्न असा आहे की क्लोजर रिपोर्ट म्हणजे काय? या आधारावर न्यायालय आपला निकाल देऊ शकेल का? क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतर त्याला कुठे आव्हान देता येईल? जाणून घेऊया त्याचे नियम.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचे वाटत होते, मात्र जसजसे प्रकरण पुढे सरकत गेले तसतसे अनेक पैलू समोर आले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.
सीबीआयने क्लोजर रिपोर्टमध्ये काय म्हटले?
सीबीआयने आपल्या अहवालात सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू आत्महत्या असल्याचे मान्य केले असून त्याच्यावर कोणीही जबरदस्ती केली नसल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणात सीबीआयने कोणत्याही प्रकारचा कट असल्याचा इन्कार केला आहे आणि सुशांत सिंग राजपूतच्या सोशल मीडिया चॅटमध्ये कोणतीही छेडछाड झाली नसल्याचेही म्हटले आहे.
What Is Closure Report : क्लोजर रिपोर्ट म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एजन्सीचा (पोलिस किंवा सीबीआय) तपास पूर्ण होतो आणि अधिकाऱ्यांना असे वाटते की प्रकरणाच्या तपासासाठी पुरेसे पुरावे शिल्लक नाहीत, तेव्हा दंडाधिकाऱ्यांसमोर अहवाल सादर केला जातो. त्यालाच क्लोजर रिपोर्ट म्हणतात. हा अहवाल CrPC च्या कलम 169 अंतर्गत नमूद करण्यात आला आहे. या अहवालात तपास यंत्रणा पुरावे आणि चौकशीच्या आधारे निष्कर्षांचा उल्लेख करते आणि एखाद्या घटनेमागील कारण उघड करते.
क्लोजर रिपोर्टवर न्यायालय काय करते?
जेव्हा जेव्हा तपास एजन्सी एखाद्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल करते, तेव्हा दंडाधिकारी किंवा संबंधित न्यायालय अहवालाचा विचार करते. त्यानंतर तो नाकारला किंवा स्वीकारला जाऊ शकतो. क्लोजर रिपोर्टच्या आधारे कोर्टही निर्णय देऊ शकते. हा अहवाल फेटाळल्यास न्यायालय पुढील तपासाचे आदेशही देऊ शकते.
क्लोजर रिपोर्टला आव्हान देता येते का?
सुशांत सिंग राजपूतचे कुटुंब सीबीआयने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला आव्हान देऊ शकते का? कायद्यानुसार कोणत्याही क्लोजर रिपोर्टला आव्हान दिले जाऊ शकते. या प्रकरणात काही पुरावे विचारात घेतले गेले नाहीत असे पीडितेला किंवा त्याच्या कुटुंबीयांना वाटत असेल तर तशी याचिका दाखल केली जाऊ शकते.
सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाला जर तसं वाटत असेल तर ते न्यायालयात याचिका दाखल करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्पष्ट केले होते की CrPC च्या कलम 173(8) नुसार, पुढील तपासासाठी क्लोजर रिपोर्ट स्वीकारून पुनर्विचार करणे किंवा आदेश मागे घेणे आवश्यक नाही.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

