Nitin Gadkari : जनता जातीयवादी नाही, पुढारी आहेत; आपल्या स्वार्थासाठी ते जात उभी करतात; नितीन गडकरी स्पष्टच बोलले
Nitin Gadkari : सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीवादी आहेत. हे पुढारी आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (22 मार्च) अमरावतीत केलंय.

अमरावती : सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीवादी आहेत. हे पुढारी आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज (22 मार्च) अमरावतीत (Amravati) केलंय. अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे डॉ पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, यावेळी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आपल्या भाषणात असे वक्तव्य करत जातीय व्यवस्थेवर भाष्य केलं आहे. शिवाय नागपुरातील हिंसाचाराची घटना (Nagpur Violance) घडली असताना त्यांच्या या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
माझं राजकारण माझ्या हिशोबाने चालेल, तुमच्या हिशोबाने नाही- नितीन गडकरी
या कार्यक्रमात पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, माझा मुलगा आहे म्हणून त्याला राजकारणात स्थान मिळेल हे मला मान्य नाही. त्यांनी त्याच्या कर्तुत्वावर स्थान निर्माण करावे. आमदाराच्या पोटातून आमदार नाही झाला पाहिजे, खासदाराच्या पोटातून खासदार नाही झाला पाहिजे. आमदार खासदारांनी म्हणायच्या ऐवजी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी जर म्हटलं तर त्यांना अधिकार आहे. जे लोक आपलं कर्तृत्व सिद्ध करतात त्यांना हा पूर्ण अधिकार आहे. कुणाचा मुलगा, मुलगी असणे गुन्हा नाही. आज आपल्या सामाजिक जीवनामध्ये राजकारणाचा अर्थच समाजकारण आहे. विकासकारण आहे. मी लोकसभेत निवडून आलो पण मी लोकांना सांगितलं माझ्या हिशोबाने राजकारण चालेल, तुमच्या हिशोबाने नाही. तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या, नाही द्यायचं असेल तरी चालेल. जो मत देईल त्याचे काम करेल, जो नाही देईल त्याचेही काम करेल. त्यामुळे जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीवादी आहेत, हे पुढारी आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात असेही नितीन गडकरी म्हणाले.
अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रतिष्ठेचा 'डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024'ने आज (22 मार्च) अमरावतीत सन्मानित करण्यात आले. यावेळी पाच लाख रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होतं. तसेच या सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या दाननिधीतून विदर्भातील उत्कृष्ट शेतकरी महिलेला 'शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार 2024' आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने 'श्रीमती विमलाबाई देशमुख शेतीनिष्ठ महिला शेतकरी पुरस्कार 2024' असे दोन पुरस्कार अकोला येथील वंदना धोत्रे आणि भंडारा जिल्ह्यातील वंदना वैद्य या दोन उत्कृष्ट शेतकरी महिलांना दिल्या गेलं.
'ते' 25 लाख रुपये विदर्भातील पाच शेतकऱ्यांना पुरस्कार म्हणून द्या
सोबतच यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविध पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला खासदार डॉ अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, माजी आमदार प्रवीण पोटे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी पुरस्काराची रक्कम परत करत म्हणाले की, मला 5 लाख रुपये पुरस्कारातून मिळाले. त्यात 20 लाख रुपये टाकून मी 25 लाख रुपये देत आहे. ते 25 लाख रुपये विदर्भातील पाच शेतकऱ्यांना पुरस्कार म्हणून संस्थेने द्यावं, अशी मोठी घोषणा नितीन गडकरी यांनी केली
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

