ट्रेन रोखल्या, जोरदार घोषणाबाजी! चिमुकल्या मुलींवरील अत्याचारानंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट!
बदलापूरमध्ये एका शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

ठाणे : बदलापूरच्या पूर्वेला असणाऱ्या एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. यातील एक मुलगी वय 3 वर्षे आठ महिन्यांची आहे तर दुसऱ्या मुलीचे वय सहा वर्षे आहे. या घटनेनंतर बदलापूरचे नागरिक संतप्त झाले आहे. गेल्या कित्येक तासांपासून बदलापूरच्या नागरिकांना शाळेबाहेर आंदोलन चालू केले आहे. जोपर्यंत आरोपीवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. आता या आंदोलनाला आणखी व्यापक स्वरुप मिळाले आहे. या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून थेट रेल्वे रुळावर उतरले आहेत. नागरिकांनी लोकल ट्रेन थांबवून ठेवल्या आहेत.
पोलिसांनी ताटकळत ठेवलं, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न,
बदलापूरमधील एका शाळेतील हे प्रकरण समोर आल्यानंत बदलापूर तसेच समस्त महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. लैंगिक अत्याचाराचे हे प्रकरण समोर आल्यानंतर सुरुवातीला शाळेने हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला. तक्रार करायला गेलेल्या पालकांना महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल 12 तास ताटकळत ठेवले. त्यामुळेही नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
पाहा व्हिडीओ :
नागरिकांमध्ये संतापाची लाट, लोकल ट्रेन रोखल्या
हे प्रकरण समोर आल्यानंतर आता नागरिक प्रचंड संतापले आहेत. ज्या शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाले, त्या शाळेच्या बाहेर महिला तसेच पुरुष मोठ्या संख्येने जमले आहेत. नागरिक येथे घोषणाबाजी करत आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. सात दिवस झाले तरी या प्रकरणावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळेदेखील नागरिक प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आहेत. लोक बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवर जमले असून त्यांनी लोकल ट्रेन रोखल्या आहेत. रेल्वे ट्रॅकवर उतरून नागरिक जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
नेमके प्रकरण काय?
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत एका सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केला आहे. हे प्रकरण सात दिवसांनी समोर आले आहे. चिमुकल्यांच्या पालकांनी याबाबत पोलिसांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवले. आता शाळा प्रशासनाने सफाई कर्मचारी पुरवणाऱ्या कंत्राटदारासोबतचा करार रद्द केला आहे. तसेच शाळेने सर्व पालकांची जाहीर माफी मागितली आहे. घटडलेला प्रकार घृणास्पद आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असा संस्थेचा प्रयत्न आहे. आम्ही पूर्ण क्षमतेने पोलिसांना सहकार्य केले आहे, असे शाळेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
