Cidco My Homes Lottery : सिडकोच्या 26000 घरांची सोडत काही तासांवर, संगणकीय लॉटरी ड्रॉ कुठं पाहणार? सर्व माहिती एका क्लिकवर
Cidco My Homes Lottery : सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेतील 26502 घरांची सोडत काही तासांवर आली आहे.

Cidco My Homes Lottery Result नवी मुंबई : शहर व औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच सिडको माझे पसंतीचे सिडकोचे या गृहनिर्माण योजनेचा संगणकीय लॉटरी ड्रॉ 15 फेब्रुवारीला काढणार आहे. सिडकोनं या योजनेद्वारे 26000 घरांच्या विक्रीसाठी अर्ज मागवले होते. संगणकीय लॉटरी ड्रॉ तळोजा येथील रायगड इस्टेट फेज 1 येथे शनिवारी सकाळी 11 वाजता पार पडेल.
सिडकोनं नवी मुंबईतील विविध ठिकाणावरील घरांच्या विक्रीसाठी 12 ऑक्टोबर 2024 ला 26000 घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना जाहीर केली होती. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
सिडकोनं जाहीर केलेल्या 26000 घरांच्या विक्रीसाठी अर्जदारांच्या अंतिम यादीनुसार 21399 अर्जदार पात्र ठरले आहेत. सिडकोनं ईडब्ल्यूएस प्रवर्गातील घरांची किंमत 25 लाख ते 48 लाखांदरम्यान निश्चित केली होती. तर, अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी 34 लाख ते 97 लाख रुपयांपर्यंतच्या किमती निश्चित करण्यात आल्या होत्या. घरांच्या किमती अधिक असणं हे देखील एक कमी प्रतिसाद मिळण्याचं कारण मानलं जातेय.
सिडकोनं माझे पसंतीचे घर योजनेद्वारे उपलब्ध करुन दिलेली घरं वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, पूर्व(तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली येथील आहेत.
संगणकीय लॉटरीचा कार्यक्रम कधी आणि कुठे होणार?
सिडकोनं माझे पसंतीचे घर योजनेतील घरांसाठी अर्ज करण्यास अनेकदा मुदतवाढ दिली होती. याशिवाय या योजनेची प्रसिद्धी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. मात्र, या घरांसाठी कमी प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. आता या योजनेच संगणकीय लॉटरी ड्रॉ 15 फेब्रुवारी 2025 रोजी रायगड इस्टेट- फेज 1, भूखंड क्रमांक 1, सेक्टर -28 तळोजा पाचनंद येथे काढण्यात येईल. या सोडतीचं सिडकोच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन थेट प्रक्षेपण देखील केलं जाईल.
“माझे पसंतीचे सिडको घर” या सोडती अंतर्गत, सिडकोनं इच्छुक अर्जदारांना पसंत असलेले प्रकल्प स्थळ, टॉवर्स आणि मजल्यांची संख्या निवडण्याची संधी दिली होती. या घरांसाठी नोंदणी करण्यासाठी 236 रुपयांचं शुल्क आकारलं गेलं होतं. जोपर्यंत घरांच्या किमती जाहीर होत नव्हत्या तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नोंदणी करण्यात आली होती.घरांच्या किमती जाहीर झाल्यानंतर सिडकोकडे प्राधान्यक्रम नोंदवून बुकिंग शुल्क नोंदवणाऱ्यांची संख्या मात्र घटल्याचं पाहायला मिळालं.
सिडकोच्या घराचं क्षेत्रफळ किती?
सिडकोच्या माझे पंसतीचे घर या योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटाील घरांचं क्षेत्रफळ 322 चौ.फूट आहे. अल्प उत्पन्न गटा अंतर्गत 1 बीएचके सदनिकेचे आकारमान 322 चौ.फूट आणि 398 चौ.फूट असून 2 बीएचके सदनिकेचे क्षेत्रफळ 540 चौ.फू. आहे
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
