बदलापूरच्या शाळेत चिमुरड्या मुलींवर अत्याचार, किसन कथोरे म्हणाले, उलटसुलट बोलून नागरिकांना भडकवण्याचा प्रयत्न
Badlapur School Crime News: सदर घटनेवर भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Badlapur School Crime News: देशात आणि राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या अंगावर काटा आणणाऱ्या घटना कानावर येत असतानाच राज्यातील बदलापूर शहरात एक धक्कादायक घडल्याचे समोर आले आहे. बदलापूर पूर्वेला असणाऱ्या एका नामांकित शाळेतील एक तीन वर्षांची आणि दुसऱ्या सहा वर्षांच्या मुलीवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकारानंतर स्थानिक नागरिक प्रचंड संतापले आहेत. आज बदलापूर बंदाची हाक देण्यात आली असून अनेक नागरिकांनी शाळेच्या परिसरात जाऊन या घटनेचा निषेध करत आहे. शाळेच्या परिसरात पालक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.
सदर घटनेवर भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिक आमदार म्हणून आपली भूमिका काय असा सवाल विचारल्यानंतर, मी परवाच या घटनेचा निषेध व्यक्त केला आणि नुसता निषेध केला नसून तातडीने त्या पोलीस स्थानकाच्या अधिकारी होत्या त्यांची बदली केली. तसेच मी उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा केली. सदर प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी निवेदन दिलं. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी लगेच मान्यता दिली, अशी माहिती किसन कथोरे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
उलटसुलट बोलून नागरिकांना भडकवण्याचा प्रयत्न-
मी काल सकाळीच नागरिकांना आवाहन केलंय, की कोणीतरी उलटसुलट बोलून भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. संस्थेवर देखील कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. फक्त पालकांनी संयम बाळगावा, अशी माझी विनंती आहे. पालकांनी आणि नागरिकांनी संयम बाळगावा, शाळेबाहेर प्रदर्शन सुरु आहे, पण कायदेशीरपणे निश्चित त्यांना शिक्षा होईल, असं किसन कथोरे म्हणाले.
4 दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडली-
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन मुलींचे कंत्राटी सफाई कामगाराने शारीरिक शोषण केल्याने पालकवर्ग हादरला होता. या प्रकरणात अखेर 4 दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडली असून शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित, तर वर्गशिक्षिका आणि आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. तर आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आला होता त्याच्यासोबतचा करारही शाळेने रद्द केला असून शाळेच्या सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.