'तो' माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो, पदाला हापापलेला; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
मंत्री धनंजय मुंडे हा पैसा, पद आणि राजकारणाला हापापलेला माणूस असल्याचा घणाघात मराठा आंदोलत मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

परभणी : राज्याचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay munde) यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना घोटाळा झाल्याचे सांगत कृषी घोटाळा 2 असल्याचे म्हटले. तसेच, धनंजय मुंडेंनी आता माझ्याशी पुराव्यानिशी बोलावे असा दावा करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर, आमदार सुरेश धस यांनी देखील पत्रकार परिषद घेत मंत्री मुंडेंवर तब्बल 300 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. दुसरीकडे धनंजय मुंडेंनी ट्विट करुन आपणास बेल्स पाल्सी आजार झाल्याची माहिती दिली. तसेच, मला सतत 2 मनिटेही बोलायला येत नाही असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे, धनंजय मुंडे आजारपणातून बाहेर येत नसताना त्यांच्यावर गंभीर आरोप होताना दिसून येत आहे. त्यातच, मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल करत ते मंत्रीपदाला आणि पैसा, व पदाला हापापलेले आहेत, असेही म्हटले आहे.
मंत्री धनंजय मुंडे हा पैसा, पद आणि राजकारणाला हापापलेला माणूस असल्याचा घणाघात मराठा आंदोलत मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांना जनतेने मंत्री केल आहे, जर जनतेला वाटत असेल की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता तर त्यांनी द्यायला पाहिजे होता. पण धनंजय मुंडे हा पैसा, पद आणि राजकारणाला हापापलेला माणूस आहे. तो माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो आणि त्या पैशाच्या जीवावर राजकारण करतो. आतापर्यंत बऱ्याच जणांनी आपल्यावर आरोप झाल्यानंतर पदांचा राजीनामा दिला आहे, पण हा माणूस एवढा हापापलेला आहे की त्याला सत्तेतील खुर्ची सुटत नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर सडकडून टीका केली. तसेच, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, असेही त्यांनी सूचवले आहे.
सुरेश धस यांनी राजीनामा देऊन पुन्हा लढले पाहिजे होते
आमदार सुरेश धस यांच्यावर मराठा समाजाने प्रचंड विश्वास टाकला होता. कधी नव्हे तो एका मराठा लोकप्रतिनिधीवर राज्यातला मराठा समाज प्रचंड प्रेम करीत होता. मी देखील सुरेश धस यांच्यावर प्रचंड विश्वास टाकला. पण, सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची वार्ता कळल्यानंतर मात्र आमचा त्यांच्यावरला विश्वास उडून गेला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. तसेच, जरी सुरेश धस यांच्यावर पक्षाने दबाव टाकला असला तरी त्यांनी धनंजय मुंडेंची भेट घ्यायला नव्हती पाहिजे. सुरेश धस आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन मराठा समाजासमोर उभे राहिले असते तर मराठा समाजाने त्यांना डोक्यावर घेतले असते. पुन्हा एकदा त्यांना 2 लाख मतांच्या फरकांनी विजयी देखील केले असते. पण, सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन मराठा समाजाचा तर विश्वासघात केलाच, पण माझा देखील त्यांच्यावरला विश्वास उडाला आहे, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी आमदार धस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
अद्याप आरोपी मोकाट
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट सांगितले की, हे सरकार संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय देणार नाही. कारण, संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर आत्तापर्यंत झालेल्या तपासात या सरकारने सहआरोपी कोणालाच केले नाही. साध्या साध्या आरोपानंतर कोणालाही ईडी लावणारे हे सरकार, पण वाल्मिक कराडला अद्यापही ईडी लावली नाही. आरोपी अद्यापही आरोपी मोकाट आहेत तसेच मोबाईलमधील डाटा देखील अद्याप समोर आणलेला नाही. त्यामुळे, आम्हाला वाटत आहे की हे सरकार संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय देणार नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
हेही वाचा
कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

