मंदिर आणि घराबाहेरचे लाखमोलाचे ब्रँडेड शूज चोरायचे, 7 वर्षांत 10 हजार शूजवर डल्ला, 'असे' सापडले तावडीत
Bengaluru News : पोलिसांनी चप्पल चोरणाऱ्या दोन चोरांकडून 715 ब्रँडेड शूज जप्त केले असून त्याची किंमत 10 लाख रुपये इतकी आहे.
मुंबई: आपल्याकडे मंदिराबाहेरचे चप्पल चोरणाऱ्या चिंधी चोरांची संख्या काही कमी नाही. मंदिराबाहेरचे चप्पल चोरायचे आणि ते चोर बाजारात विकायचे, त्यातून मिळेल त्यावर रोजीरोटी चालवायची असा त्यांचा उद्योग. पण मंदिराबाहेरचे चप्पल चोरून लाखो रुपये कमावल्याचं सांगितलं तर कुणालाही ते आश्चर्यकारक वाटेल. बंगळुरुतील अशाच दोन चोरांवर धाडी टाकून पोलिसांनी त्यांच्याकडून 10 लाखांच्या किमतीचे ब्रँडेड शूज (Branded Shoes) जप्त केली आहेत. गेल्या सात वर्षांत या चोरांनी 10 हजार ब्रँडेड शूज चोरल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
बंगळुरुतील विद्यारनयपुरा पोलिसांनी दोन चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 10 लाख किमतीचे शूज जप्त केले आहेत. गेल्य सात वर्षात या दोन चोरांनी मंदिराबाहेरचे आणि सोसायट्यांमधील ब्रँडेड शूज चोरी केले. आतापर्यंत या चोरांनी असे 10 हजार शूज चोरी केल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. गंगाधर आणि यल्लाप्पा असं या दोन चोरांचं नाव आहे.
रिक्षाने जायचे आणि चपलांची चोरी करायचे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाधर आणि यल्लाप्पा हे दोघे रात्री ऑटोने सोसायटी किंवा मंदिरात जायचे. त्या ठिकाणी असलेल्या ब्रँडेड शूजवर ते डल्ला मारायचे. चोरी केलेले ब्रँडेड शूज ते अत्यंत कमी किमतीला विकायचे.
बंगळुरूमध्ये चोरी केलेले ब्रँडेड शूज ते चोर उटीस पाँडिचेरी आणि इतर पर्यटन स्थळी जाऊन विकायचे. त्यापैकी काही शूज हे रविवारच्या बाजारात विक्री करायचे आणि फायदा मिळवायचे.
BEL Layout या विद्यारनयापुरातील एका बंगल्यामध्ये हे दोन चोर घुसले आणि त्या ठिकाणाहून दोन सिलेंडर, काही शूजवर डल्ला मारला. दुसऱ्या दिवशी घरमालकाने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही चेक केले.
सीसीटीव्ही तपासला असता पोलिसांना ती रिक्षा दिसली ज्यामधून हे दोन चोर चोरी करायचे. पोलिसांनी त्याचा माग काढल्यानंतर ते या चोरापर्यंत पोहोचले. गंगाधर आणि यल्लाप्पाला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून 715 शूज जप्त केले. त्याची किंमत 10 लाख इतकी आहे. गेल्या सात वर्षांपासून या चोरांनी मंदिर आणि सोसायट्यामध्ये चोरी केल्याचं समोर आलं.
ही बातमी वाचा: