Eknath Khadse : जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
Eknath Khadse : जळगाव जवळील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्या हत्येवरून एकनाथ खडसे यांनी संताप व्यक्त केलाय.

Eknath Khadse : जळगाव (Jalgaon News) जवळील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच युवराज कोळी (Yuvraj Koli) यांचा शुक्रवारी (दि. 21) निर्घृण खून करण्यात आला. गावातीलच तिघांनी युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढविला होता. चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर हल्ला केल्याने युवराज कोळी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जळगावात संतापाची लाट उसळली आहे. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. शिवसेनेच्या उपसरपंचाची निर्घुण हत्या करण्यात आली. सरपंचाची हत्या या राज्यात व्हायला लागल्या आहे. या राज्यात सरपंचही आता सुरक्षित राहिलेले नाहीत, लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत, अशी स्थिती जळगाव जिल्ह्यात झाली आहे, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केलाय.
महिलांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह
धरणगाव तालुक्यातील एका गावात टवाळखोरांनी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून मुलीची आणि तिच्या बहिणीची छेडखानी करत मारहाण केली. टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे. यावरून एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. धरणगावमध्ये एका मुलीला छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या सुरक्षेविषयी या जिल्ह्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, राज्यातही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
पोलिसांचा धाक आता राहिलेला नाही
तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांचा विरोधात गुन्हा दाखल केला होता. यातील तीन जणांना अटक तर एक अल्पवयीन ताब्यात घेत त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली होती. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र पीयूष मोरे, चेतन भोई आणि सचिन पालवे हे तिघे जण पोलिसांनी शोध घेऊनही सापडू शकले नसल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनले आहेत. याबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, तीन आठवडे होऊन पोलिसांना गुन्हेगार सापडत नाहीत, म्हणजे पोलीस प्रकरणात हलगर्जीपणा करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला काय न्याय मिळणार? एकंदरीत जळगाव जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था इतकी बिघडली आहे की, आता पोलिसांचा आणि यंत्रणेचा धाक आता राहिलेला नाही, असा संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

