पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी लातूरनंतर आता बीड, नीट पेपरफुटी प्रकरणात नेमकं काय समोर काय?
नीट पेपरफुटीप्रकरणी रोज नवनवी माहिती समोर येत आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे लातूरपर्यंत असल्याचे म्हटले जात होते. पण आता या सर्व प्रकरणाचे केंद्र बीड आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

लातूर : नीट पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आतापर्यंत या फेरफुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत असल्याचं म्हटलं जात होतं. पण आता पोलिसांच्या तपासाचे केंद्र लातूर ऐवजी आता बीड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींकडे सापडलेल्या 14 प्रवेशपत्रांपैकी आठ प्रवेशपत्र बिहारमधील आहेत. त्यात एक लातूरचा तर सात बीडचे विद्यार्थी आहेत. सापडलेल्या प्रवेशपत्रांपैकी सर्वाधिक संख्या ही बीडच्या विद्यार्थ्यांची असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांचे लक्ष आता बीडकडे वळाले आहे.
लातूर पोलिसांकडून चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल
नीट पेपरफुटीचा तपास आता सीबीआयकडे वर्ग झालेला आहे. सीबीआयची टीम लातूरमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर लातूर पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. संजय जाधव आणि जरील पठाण यांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर दोन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.लातूर पोलिसांनी आरोपीचे मोबाईल तपासले असता अनेक बाबी उघड झाल्या आहेत.
पोलिसांच्या हाती आली महत्त्वाची माहिती
यामध्ये आरोपींनी केलेले विविध ठिकाणचे आर्थिक व्यवहार, दिल्ली स्थित आरोपी गंगाधर याच्याबरोबर झालेले आर्थिक व्यवहार, आरोपींच्या मोबाईलमध्ये आढळलेले 14 प्रवेशपत्र, परराज्यातील वेगवेगळ्या नीट पेपर सेंटरची माहिती अशी एकूण माहिती पोलिसांना हाती लागली आहे.
बीडचं नेमकं कनेक्शन काय?
आरोपींच्या चौकशीतून पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एकूण 14 पैकी आठ प्रवेशपत्र हे परराज्यातील आहेत. त्यापैकी सात प्रवेशपत्र हे बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आहेत, तर एक प्रवेशपत्र हे लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आहेत. याच कारणामुळे लातूर पोलिसांच्या तपासाचा फोकस आता बीड जिल्ह्याकडे वळला आहे. पोलिसांनी तेथील पालकांची चौकशी केली आहे. या चौकशीतूनही पोलिसांच्या हाती काही माहिती लागली आहे. हाती लागलेल्या आरोपीच्या व्यतिरिक्त बीडमध्ये आणखी काही नेटवर्क काम करत आहे का? याचा तपास आता पोलीस करत आहेत.
दलालांचा सुळसुळाट...
कोणतं वैद्यकीय महाविद्यालय हवं, तेवढी गुण आम्ही मिळून देतो त्यासाठी पैसा लागतील असे सांगणारे अनेक दलाल मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात फिरत होते. पुनर्परीक्षा देणारे जे रिपीटर विद्यार्थी आहेत, त्यांना या टोळीकडून टार्गेट केले जात होते. अशा विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर मिळवून त्यांना गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून पेशांची मागणी केली जात होती. अनेक उदाहरणं समोर आल्यामुळे आता ही बाब उघड झाली आहे. विद्यार्थ्यांना आमिष दाखवण्यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल नंबर आणि या टोळीत काम करणाऱ्या व्यक्तींचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
