IND vs SA: 'मिलर'ची 'किलर' कामगिरी! 'इतक्या' वेळा जिंकलाय सामनावीराचा पुरस्कार, एबी डिविलियर्सलाही टाकलं मागं
IND vs SA: दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला सात विकेट्सनं पराभूत केलं.

IND vs SA: दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला सात विकेट्सनं पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात डेव्हिड मिलरनं महत्वाची भूमिका बजावली. ज्यामुळं त्याला सामनीवर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसेच दक्षिण आफ्रिकेकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेसाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होता.
एबी डिव्हिलियर्सला टाकलं मागं
मिलरनं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आठव्यांदा सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय. यापूर्वी एबी डिविलियर्स याच्या नावं हा विक्रम होता. त्यानं सात वेळा टी20 क्रिकेटमध्ये सामनावीर होण्याचा मान मिळवला होता. परंतु आता मिलरनं त्याला मागं टाकलं आहे.
भारताचा सात विकेट्सनं पराभव
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी-20 सामना दिल्ली येथे खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं 20 षटकात दक्षिण आफ्रिकेसमोर 211 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तुफानी फलंदाजी केली. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 19.1 षटकातचं लक्ष्य गाठलं. रासी व्हॅन डर डसेन (46 चेंडूत 75 धावा) आणि डेव्हिड मिलर (31 चेंडूत 64 धाव) दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
भारताची वर्ल्ड रेकार्ड बनवण्याची संधी हुकली
रासी व्हॅन डर डसेन आणि डेव्हिड मिलर यांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सात विकेट्स राखून पराभव केला. या पराभवासह भारताची वर्ल रेकार्ड बनवण्याची संधी हुकली आहे. भारतानं सलग 12 टी-20 सामन्यात विजय मिळवून आफगाणिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. परंतु, आतापर्यंत कोणत्याही संघानं सलग 13 टी-20 सामने जिंकले नाहीत. परंतु, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडं विश्वविक्रम रचण्याची संधी होती. मात्र, या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागल्यानं विश्व विक्रम रचण्याची संधी हुकली.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
