Santosh Deshmukh : संतोष देशमुखांना न्याय कधी मिळणार? ग्रामस्थांचे अन्नत्यागाचं हत्यार, आतातरी सरकार जागं होणार का?
Santosh Deshmukh Murder Case : देशमुख कुटुंबीयांच्या आणि मस्साजोगकरांच्या वतीने अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात झाली असून आता तरी सरकार दिलेलं आश्वासन पूर्ण करणार का हे पाहावं लागेल.

बीड : संतोष देशमुखांच्या हत्येला 79 दिवस झाले तरी एक फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. फरार आरोपीला अटक करावी, आरोपींना मदत करणाऱ्यांना सहआरोपी करावं अशा विविध मागण्यांसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आग्रही आहेत. न्यायाच्या प्रतीक्षेत धनंजय देशमुखांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. सरकारकडून जलदगतीने कारवाईची ग्वाही देण्यात आली असली तरी गावकरी या साखळी आंदोलनावर ठाम आहेत.
9 डिसेंबर 2024 पासून दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावातून शांतता, हास्य, स्थैर्य हरवल्या सारखं झालंय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 79 दिवस उलटले. देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी. आरोपींना शिक्षा देऊन कुटुंबीयांना न्याय द्यावा अशा इतर मागण्यांसाठी मस्साजोगमधील नागरिकांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसोबत गावातील दोनशेपेक्षा जास्त लोक या अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. साखळी पद्धतीने आणखी गावकरी आणि बाहेरुन येणारे लोक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.
अन्नत्याग करु नका असं आवाहन मस्साजोग दौऱ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यांनी देशमुख कुटुंबियांशी फोनवरुन आवर्जून संवाद साधला. आईची काळजी घ्या अशी विनंतीही त्यांनी देशमुखांना केली. आंदोलनस्थळी भेट देणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी तपास करणाऱ्या पोलिसांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलंय.
ज्या पोलिसांनी याचा तपास केला तत्कालीन पोलीस अधीक्षक डीवायएसपी पोलीस प्रशासनातील प्रशासन होते त्यांचे सीडीआर तपासणे गरजेचे आहे. ज्या आरोपींच्या अकाउंटवर पैसे ट्रांजेक्शन करण्यात आले त्यांना सहआरोपी करणे गरजेचे आहे. आरोपींना मदत करणाऱ्यांना अटक करा.
मराठा आंदोलक मनोज जरांगेंनीही देशमुख कुटुंबीयांची बाजू मांडत सरकारला प्रश्न विचारले. तसंच बीड जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत देशमुख कुटुंबीयांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहन केलं. शिंदेंच्या काम करण्याच्या स्टाईलचं कौतुक करताना जरांगेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय.
मविआचे नेते सरकारच्या भूमिकेवरती सवाल उपस्थित करताहेत तर सत्ताधाऱ्यांकडून देशमुख कुटुंबियांना आश्वासन देण्यात येतंय. आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना पत्र दिलं. शासन संवेदनशील असल्याचं सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती तहसीलदारांनी केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांच्या तपासावर पहिल्या दिवसापासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अशातच वाल्मिक कराड आणि त्यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे धनंजय मुंडे राजकीय टार्गेट ठरताहेत. पोलिसांनी किंवा प्रशासनाकडून दिलेली काही आश्वासनं पूर्ण होत नसल्यानं मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाचं हत्यार उपसलंय. आता ग्रामस्थांचा विश्वास संपादन करण्याचं आव्हान सरकार आणि पोलीस यंत्रणेसमोर असणार आहे.
ही बातमी वाचा:
























