MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
Mumbai Metro News : सिस्त्रा या फ्रेंच कंपनीचे कंत्राट विनाकारण रद्द करणं बेकायदा असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

MMRDA News : मुंबई मेट्रोसाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या सिस्त्रा एमव्हीए कंन्स्लटींग(इंडिया) प्रा. लि. (French firm Systra) या कंपनीचं कंत्राट रद्द करणाऱ्या एमएमआरडीएला हायकोर्टानं चांगलाच दणका दिला आहे. एमएमआरडीएनं या कंपनीला बजावलेली नोटीस बेकायदा ठरवत मुंबई उच्च न्यायालयानं ती रद्द केली आहे. दिलेलं कंत्राट रद्द करत एमएमआरडीएनं पाठवलेल्या नोटीशीविरोधात कंपनीनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अलोक अराधे आणि न्यायमूर्ती आरिफ डॅाक्टर यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. एमएमआरडीएनं कंपनीचं म्हणणं पुन्हा ऐकून घेत त्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेशही हायकोर्टानं एमएमआरडीएला दिलेत.
काय आहे प्रकरण?
ठाणे-भिवंडी-कल्याण, अंधेरी-सीएसएआय व भाईंदर मेट्रोचा आराखड, बांधकाम आणि व्यवस्थापन करण्यासाठी सल्लागार म्हणून काम करण्यासाठी एमएमआरडीएनं 11 फेब्रुवारी 2020 मध्ये निविदा मागवल्या होत्या. यामध्ये 'सिस्त्रा' या कंपनीची निविदा मंजूर झाली. कंपनीला 42 महिन्यांचे कंत्राट देण्यात आलं. 31 मे 2021 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी हे कंत्राट होतं. त्यानंतर कंपनीनं मुदतवाढीसाठी अर्ज एमएमआरडीएकडे सादर केला. त्याला एमएमआरडीएनं मान्यताही दिली. त्यानुसार 31 डिसेंबर 2026 रोजी हे कंत्राट संपणार होते. मात्र 3 जानेवारी 2025 रोजी एमएमआरडीएनं अचानक कंपनीला हे कंत्राट रद्द केल्याची नोटीस दिली. या नोटीसला कंपनीनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं.
कंत्राट अचानक का रद्द केलं?, याचं कोणतंही कारण एमएमआरडीएनं दिलेलं नाही. करारानुसार कंत्राट रद्द करताना त्याचं कारण एमएमआरडीएनं नमूद करण आवश्यत होतं, असा युक्तिवाद कंपनीनं केला. तर एमएमआरडीएनं आपल्या विशेष अधिकारात हे कंत्राट रद्द केलेलं आहे. त्यामुळे त्याचं कारण नमूद करण्याची गरज नाही, असा दावा एमएमआरडीएच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला होता.
एमएमआरडीएचे अधिकारी बिलं मुद्दाम थकवत असल्याचा गंभीर आरोप, सिस्त्रा या फ्रान्सच्या कंपनीने केला होता. मात्र एमएमआरडीनं सिस्त्रा कंपनीचे सर्व आरोप फेटाळले होते. तसेच सिस्त्राचे आरोप निराधार असून करारभंगाबद्दल नोटिसही दिली असल्याचं एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आलं.
फ्रान्सच्या सिस्त्रा या कंपनीनं एमएमआरडीए आरोपांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी मी बोलेन अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. पारदर्शकता राखण्यासाठी कोणतीही किंमत मोजू असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
ही बातमी वाचा:






















