Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.

Manikrao Kokate : मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik Court) ठोठावली आहे. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहेत. त्यातच शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी सत्र न्यायालयात अपील केले. आता माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, माणिकराव कोकाटे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.
शासनाच्या सदनिका लटल्या प्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना दोन वर्षाची शिक्षा झाली होती. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या निर्णयाला कोकाटे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले. याबाबत सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीत दोन वर्षांच्या शिक्षेला न्यायालयाने अपील पिरेड पूर्ण होईपर्यंत सस्पेंड केले आणि 1 लाख रुपयांच्या जामिनावर माणिकराव कोकाटे यांची मुक्तता केली.
अपात्रतेची टांगती तलवार कायम
अपील पिरेड पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना शिक्षा करण्यास सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मात्र आमदार अपात्र प्रकरणी स्थगिती मिळावी, यासाठी सादर केलेल्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. सरकारी पक्ष उद्या आपली बाजू मांडणार आहे. त्यानंतर कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीबाबतच्या अर्जावर सुनावणी केली जाणार आहे. या सुनावणीत नेमकं काय होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दिवंगत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांची कन्या अंजली राठोड यांची माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. ही याचिका आज विचारात घेण्यात आली नाही.
नेमकं प्रकरण काय?
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. गुरुवारी (दि. 20) या प्रकरणात नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. मात्र, आता न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा दिलाय.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
