एक्स्प्लोर
Solapur : स्मार्ट फोनच्या जमान्यातही सोलापूरमध्ये जपली महाराष्ट्राची अनोखी परंपरा
Solapur : महाराष्ट्राच्या मातीतल्या अनेक परंपरा ग्रामीण भागाने आजही जतन करुन ठेवल्याचे आपल्याला पहायला मिळतात.

Solapur
1/13

महाराष्ट्राच्या मातीतल्या अनेक परंपरा ग्रामीण भागाने आजही जतन करुन ठेवल्याचे आपल्याला पहायला मिळतात. मोबाईलच्या आभासी विश्वात तरुणाई हरकुन गेलेली असताना माळशिरस तालुक्यातील निमगावमध्ये हिच तरुणाई वावड्याच्या खेळात रंगून गेलेले अनोखे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेला वावडी महोत्सव यंदा खूप उत्साहात सुरु झाला आहे.
2/13

वावड्या उडविणे या शब्दाचा मराठी अर्थ तसा अफवा पसरविणे किंवा थापा मारणे असा असला तरी ज्यावरून हा शब्द रूढ झाला तोच हा वावड्याचा खेळ होय. आपल्या देशात सर्वत्रच पतंग उडविले जातात, मात्र वावड्या ही भानगड फारच वेगळी आहे. वावडी म्हणजे भले मोठे म्हणजे 5 फुटापासुन 30 फुटापर्यंतचे अजस्त्र पतंग.
3/13

याला उडवायला लागतात 30 ते 40 जणांचे टोळके आणि बोटभर जाडीचा कासरा. अशी ही भन्नाट वावडी उडवायलाही लागते मोकळे माळरान .. मग चला तर बघु या अजस्त्र वावड्या कशा वाऱ्याशी स्पर्धा करतात ते या निमगाव वावडी महोत्सवातून
4/13

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधील निमगाव मगराचे नाव महाराष्ट्राला कुस्तीमुळे ओळखले जाते. तरी कुस्तीसोबत इथला गझी ढोल आणि वावड्या देखील तेवढ्याच प्रसिद्ध आहेत.
5/13

अनेक पिढ्यापासून चालत आलेल्या परंपरा संपूर्ण गावाने मिळून साजऱ्या करायची प्रथा पडलीय म्हणूनच गौराई आणि नागपंचमीच्या निमित्ताने इथे हा वावड्याचा खेळ खेळाला जातो. वावड्यांवर लिहिलेले संदेश आणि घोषणाही आकर्षक असतात. यंदा ईडी सरकार , सत्तेचा बाजार जनता बेहाल , काय झाडी काय डोंगार अशा राजकीय स्लोगनसह शेतकरी राजा , बेटी बचाव , निसर्ग संगोपन असे अनेक प्रकारचे संदेश लक्ष वेधुन घेत होती.
6/13

वावडी बनविणे हे अतिशय कौशल्याचे काम असते. उंच हवेत तिला पोचवण्यासाठी वावडीचे वजन समतोल राहणे अत्यंत आवश्यक असते. वावडी बनविताना अखंड बांबू किंवा वेळू चा वापर करतात. हा वेळू पाण्यात दोन दिवस भिजत ठेवून बाहेर काढून घेतात. तो सरळ उभा चिरून एक सारख्या आकाराच्या त्याच्या कामठया काढल्या जातात. त्यास आयताकृती आकारानुसार या कामठया जोडल्या जातात. बरोबर मधली कामठी बाहेर काढून त्यास चंग बांधले जातात.
7/13

दोरा व सुतळीच्या साह्याने ही आयताकृती प्रतिमा तयार झाल्यानंतर त्यास वरून डिंक किंवा चिकट पदार्थाच्या साह्याने एक फेटा किंवा धोतराचे कापड लावून वरून एक रंगीबेरंगी कागद लावला जातो. यावर सामजिक संदेश रंगविला जातो. या वावडीस मंगळसूत्र असते, ज्या दोरीच्या साह्याने वावडी हवेत जाते, त्याला मंगळसूत्र म्हणतात.
8/13

येथील अजस्त्र वावड्या हवेत उडविण्यासाठी व तिचा हवेत समतोल ठेवण्यासाठी तिचे मंगळसूत्र आणि खाली बांधलेली शेपूट अतिशय महत्वाची असते. अशा पद्धतीने तयार झालेल्या मोठ्या वावड्या एखाद्या मंडपाच्या छताप्रमाणे दिसतात. यानंतर वावडीच्या आकारानुसार त्यास दोरी लावून आकाशात उडविण्याची तयारी पूर्ण होते .
9/13

इतक्या मोठ्या आणि वजनदार वावड्यासाठी 5 सेंटीमीटर जाडीची नायलॉन दोरी किंवा म्हशीला बांधायचा कासरा वापरण्यात येतो. वावड्या उडवणाऱ्या तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात हलग्या , पिपाण्या , शिंगाडे , डफ यांचा गजर चालू होता
10/13

या वावड्या हवेत सोडणे देखील एक कला असते. वाऱ्याचा झोत आणि दिशा याचा विचार करून मोकळया रानात एका वावडीसाठी 40 ते 50 तरुण झटत असतात. काही वावडी धरून काही त्याची शेपटी हातात धरून थांबतात.
11/13

उरलेले 15 - 20 तरुण वावडीची दोरी लांब पर्यंत सोडवून उभे राहतात. वाऱ्याचा जोरदार झोत येताच ही वावडी हवेत उडवतात तर बाकीचे तिची दोरी घेऊन पळत सुटतात . काही प्रयत्नानंतर अखेर यश येते आणि या वावड्या हवेत झेपावू लागतात. जसजसा वाऱ्याचा दाब वाढेल तशा या वावड्या उंच आकाशात स्थिर होऊ लागतात.
12/13

निमगावच्या आकाशात सायंकाळी सहा पर्यंत 200 पेक्षा जास्त रंगीबेरंगी वावड्या वाऱ्याशी स्पर्धा करीत उंच आकाशात उडू लागल्या होत्या. यातही काहींना अपयश येत होते तर काहींचे जवळपास 500 फुटापेक्षा जास्त उंचावर जाऊन स्थिर झाल्या होत्या. या विविध रंगांच्या वावड्यामुळे निमगाव परिसरातील आकाश रंगीबेरंगी बनून गेले होते.
13/13

हा आगळा वेगळा रंगीबेरंगी वावड्याचा उंच आकाशातील खेळ पाहण्यासाठी पंचक्रोशीतून नागरिक येत असतात. या खेळातील सांघिक भावना पुढील वर्षभर गावाची एकी अबाधित राखण्यासाठी उपयुक्त ठरते .
Published at : 06 Aug 2022 10:48 PM (IST)
Tags :
Solapurअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
