चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
यात सात गावे पिण्याच्या जल स्रोताच्या बाबतीत अतिशय धोकादायक स्थितीत असल्याने ते डेंजर झोनमध्ये असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
Wardha: वर्धा जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये नायट्रेटसारख्या घातक रसायनाचे प्रमाण वाढले असून वर्धातील 42 गावांमध्ये 95 जलस्रोत नायट्रेटने बाधित झाल्याची धक्कादायक माहिती भूजल सर्वेक्षणाच्या अहवालातून समोर आली आहे. या नायट्रेटमुळे लहान मुले, गर्भवती महिला आणि आरोग्याने कमकुवत असलेल्या व्यक्तींना गंभीर धोका असल्याचं सांगण्यात येतंय. जिल्हयातील 7 गावं डेंजर झोनमध्ये असल्यानं प्रशासनाकडून अद्याप यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. ( Water Crisis)
या समस्येमुळे वर्धा आणि सेलू तालुक्यातील अनेक गावांमध्ये चिंता वाढली आहे. वाघाळा हे गाव नायट्रेटचे सर्वाधिक प्रमाण असलेले ठरले आहे, तर वाघाडा, चितोडा, नांदोरा, नागपूर, तुळजापूर, आणि धोत्रा रेल्वे ही गावे डेंजर झोनमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लहान मुले, गर्भवती महिलांना धोका अधिक
वर्धा जिल्ह्यात पिण्याच्या जल स्रोतांमधील पाण्यात मोठ्या प्रमाणात नायट्रेट आढळून आले आहे. वर्धा आणि सेलू या दोन तालुक्यातील पाण्यात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार वर्धा जिल्ह्यातील तब्बल 42 गावांमध्ये 95 जलस्त्रोत नायट्रेटने बाधित आहे. या 95 स्रोतातील पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने हे स्रोत लवकरात लवकर बंद करणे अथवा यात सुधारणा करणे अत्यावश्यक झाले आहे. 42 गावांमध्ये पिण्याच्या पाण्यात 45 पीपीएमपेक्षा जास्त नायट्रेट आढळून आले आहे. यात सात गावे पिण्याच्या जल स्रोताच्या बाबतीत अतिशय धोकादायक स्थितीत असल्याने ते डेंजर झोनमध्ये असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. काही गावांमध्ये हे नायट्रेटचे प्रमाण 96 पीपीएमपर्यंत असल्याचे तपासणीत समोर आल्याने लहान मुले, गर्भवती महिला आणि रुग्णांना याचा धोका अधिक आहेय. 2024 - 25 या वर्षात मान्सूनपूर्व आणि मान्सून पश्चात पाणी नमुने प्रयोगशाळेतून तपासण्यात आले. यात सेलू तालुक्यातील वाघाळा हे गाव नायट्रेट ने सर्वाधिक बाधित असल्याचे समोर आले याशिवाय कारंजा, हिंगणघाट आणि समुद्रपूर या तालुक्यात काही गावांमध्ये नायट्रेटचे प्रमाण आढळून आले असल्याची धक्कादायक माहिती भूजल सर्वेक्षण विभागाकडून समोर आली आहे.
पाणी पुरवठा विभागाकडून पुर्नतपासणी
भूजल सर्वेक्षण आणि वर्धा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाणी गुणवत्तेची वेळोवेळी तपासणी केली जाते. जलस्त्रोतामध्ये सुधारणा करणे ही तांत्रिक बाबी देखील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडून करणे अपेक्षित असते पण गेल्या एक वर्षात 42 गावात नायट्रेटचे प्रमाण असताना यावर ठोस पाऊल उचलले गेले नाहीए. यात सात गावे अति धोकादायक स्थितीत आहे, यात वाघाडा, चितोडा, नांदोरा, नागपूर, तुळजापूर, धोत्रा रेल्वे या गावांचा समावेश आहेय. आता अहवाल समोर आल्यावर मात्र पाणी पुरवठा विभागाकडून पुन्हा पाणी तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.