Sanjay Raut : एकनाथ शिंदे-अमित शाह यांच्यातील संवाद खरा; सावरकरांची शपथ घेऊन सांगा चर्चा झाली की नाही; संजय राऊतांचं ओपन चॅलेंज
Sanjay Raut on Eknah Shinde : खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'अस्वस्थ आत्मा' असा उल्लेखही केलाय.

Sanjay Raut on Eknath Shinde : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या आजच्या 'रोखठोक'मधून धक्कादायक दावा केला. तुमचा पक्ष भाजपात विलीन करा, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील देखील रोखठोकमधून मांडण्यात आलाय. आता याबाबत सावरकरांची शपथ घेऊन सांगा चर्चा झाली की नाही, असे खुले आव्हान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
संजय राऊत म्हणाले की, हा खरा संवाद आहे. पहाटे चार वाजता एक अस्वस्थ आत्मा त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना म्हणजेच अमित शाह यांना भेटतात. तेव्हा ते काय सांगेल. तो पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची करेल, मला कसा त्रास दिला जात आहे. माझी कशी कोंडी केली जात आहे. माझे अधिकार कसे काढून घेतले जात आहेत. माझ्याबरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत. माझ्याबरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखला आहे. याबाबत त्यांची चर्चा झाली आहे. तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो आता आम्ही काय करायचे? मला मुख्यमंत्री करा, अशी चर्चा एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात झाल्याचा दावा त्यांनी केला. तर एकनाथ शिंदे यांनी वीर सावरकरांची शपथ घेऊन सांगावे अमित शाहांशी चर्चा झाली की नाही, असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे.
संवाद झाल्याची देवेंद्र फडणवीसांनाही माहिती
अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यातला संवाद उघड कसा होतो? याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, बऱ्याच गोष्टी उघड होत असतात. ज्या गोष्टी बाहेर आणायच्या असतात ते मोठे राजकारणी आपोआप बाहेर आणतात. या देशात असे होत आहे. जगभरात असे होत असते. यापेक्षा वेगळा संवाद दोघांमध्ये होऊ शकतो का? देवेंद्र फडणवीस यांना देखील माहीत आहे की, हा संवाद झालेला आहे, असेही त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या























