महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनसंघर्षावर आधारित असणारा "छावा" चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडणार आणि जीवनचरित्रावर आधारित छावा (Chhaava) चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी शिवभक्त आणि सिनेचाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून सिनेमागृहात चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमागृहाबाहेर येणारे प्रेक्षक डोळ्यातून अश्रू ढाळत असल्याचेही दिसून आले. अंगावर शहारे आणणारे प्रसंग आणि तितकेच दमदार डायलॉग हे शिवभक्तांचे रक्त सळसळ करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज (Sambhaji maharaj) हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. महाराष्ट्रभूमीत जन्मलेला या दोन्ही महाराजांनी अखंड हिंदुस्थानचा इतिहास रचला. त्यामुळेच, महाराष्ट्रात हा चित्रपट टॅक्स मुक्त करावा, अशी मागणी होत आहे. त्यातच, आता राज्यातील महायुती सरकारमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही ही मागणी केली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून महाराष्ट्र सरकारला छावा चित्रपटासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनसंघर्षावर आधारित असणारा "छावा" चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे. सूरज चव्हाण यांच्या मागणीनंतर आता इतरही पक्षातील नेते मंडळी छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी करू शकतात. अभिनेता विक्की कौशल आणि तेलगू अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. चित्रपटात अभिनेता विक्की कौशलने संभाजी महाराजांची भूमिका आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. दोघांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून 'छावा'ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर विक्की कौशलने खास पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात अनेकदा मराठी चित्रपट टॅक्स फ्री करण्यात येतो. मात्र, एखादा हिंदी चित्रपट, जो महाराष्ट्राशी संबंधित आहे, महाराष्ट्राच्या इतिहास किंवा महापुरुषांच्या जीवनसंघर्षावर आधारित आहे, तोही टॅक्स फ्री केला जातो. यापूर्वी अभिनेता अजय देवगणच्या तान्हाजी चित्रपटाला करमुक्त करण्यात आले होते. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. आता, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपटही टॅक्स फ्री होऊ शकतो.
चाहत्यांसाठी विकी कौशलची खास पोस्ट
"तुमच्या प्रेमामुळे आज 'छावा' खऱ्या अर्थानं जिवंत झाला. तुमचे मेसेज, फोन, व्हिडीओ, चित्रपट पाहताना तुम्हाला आलेले अनुभव... या सगळ्या गोष्टी पाहून मी भारावून गेलोय. मी सगळं काही पाहतोय… आणि चित्रपटाला मिळणारं प्रेम पाहून प्रचंड सुखावलोय. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार… छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांची शौर्यगाथा सिनेमागृहांमध्ये जाऊन अनुभवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार… विश्वास आपके साथ हो, तो युद्ध लगे त्योहार!, असे विक्की कौशलने म्हटले आहे.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

