Sanjay Raut on Narayan Rane : ...तेव्हा राणेंच्या कुटुंबीयांनीच उद्धव ठाकरेंना फोन केला होता; नारायण राणेंच्या दाव्याची राऊतांकडून चिरफाड
Sanjay Raut on Narayan Rane : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव घेऊ नका, अशी विनंती करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मला दोन फोन केल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

Sanjay Raut on Narayan Rane : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) नाव घेऊ नका, अशी विनंती करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मला दोन फोन केल्याचा दावा भाजपचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार पलटवार केलाय. उद्धव ठाकरेंनी असा कोणताही फोन केला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. उलट नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडून उद्धव ठाकरेंना फोन आल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय.
संजय राऊत म्हणाले की, माझी या विषयावर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, असे काही घडले, याचा पूर्णपणे त्यांनी इन्कार केला. कोणताही फोन यासंदर्भात नारायण राणे यांना झाला नाही आणि हे संभाषण झाले नाही, असे त्यांनी म्हटले. मिलिंद नार्वेकर यांच्याशी देखील माझे बोलणं झालं. अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झालेले मला दिसत नाही आणि झालेच नाही. नारायण राणे कशाच्या आधारावर असे प्रकारचे वक्तव्य करत आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यांची प्रकृती बरी नाही का? त्यांनी सत्तरी पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते.
...तेव्हा राणेंच्या कुटुंबीयांनीच उद्धव ठाकरेंना फोन केला होता
माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी स्पष्ट शब्द सांगितले आहे की, अशा प्रकारची कोणतेही संभाषण फोनवर झालेले नाही. नारायण राणे यांना जेव्हा अटक केली, मुख्यमंत्र्यांवर भाष्य केले होते तेव्हा त्यांच्या कुटुंबातून उद्धव साहेबांना फोन आले होते. सांभाळून घ्या, त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांना काही विकार आणि त्रास आहेत. त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी पोलिसांना सूचना देऊन त्यांची सुटका करायला लावली होती, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.
मोदी, शाहांचे राज्य आल्यापासून दळभद्री राजकारण
संजय राऊत पुढे म्हणाले की, केंद्रातून देखील फोन आले. अमित शाह यांचा उद्धव ठाकरे यांना फोन आला होता. ते आमचे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचे फोन होते. आता या गोष्टी काढायच्या असतात का? आता तुम्ही काढले त्यामुळे आम्हाला सांगावं लागलं. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. वैयक्तिक चर्चा अशाप्रकारे खोटा मुलामा लावून 5-10 वर्षांनी बाहेर काढल्या जात आहेत. असे काढायचे असेल तर प्रत्येकाचे काहीतरी असते. महाराष्ट्रात असे वातावरण कधी नव्हते. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संवाद कायम होता. कोणतीही कारवाई कुटुंबापर्यंत जात नव्हती. कुटुंबाची बदनामी होत नव्हती. दुर्दैवाने गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे राज्य आल्यापासून असे दळभद्री राजकारण सुरु झाल्याचा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला.
तैमुर नावाचं उल्लेख करत पंतप्रधान मोदींवर निशाणा
दरम्यान, औरंगजेबाची कबर ही राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आली. त्यानंतर नागपूरमधील हिंसाचार उफाळला. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. या सर्व घडामोडींचा समाचार खासदार संजय राऊत यांनी सामानाच्या रोखठोकमधून घेतला आहे. याबाबत संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी तैमुर नावाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. औरंगजेबाची कबर उखडून टाका, जे आमच्या मराठ्यांच्या पराक्रमाचे स्मारक आहे. पण त्याच वेळेला ज्याने या देशामध्ये सगळ्यात जास्त हिंसाचार, हत्या, मंदिरं पाडली तो तैमुर. त्याच्या नावाने एक फिल्म स्टार आपल्या मुलाचं नाव ठेवतो आणि पंतप्रधान त्या तैमुरचं कौतुक करतात. तैमूर कहा है? असं विचारतात. जेव्हा हे सैफ अली खान आणि त्यांची बायको करीना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते. तेव्हा पंतप्रधानांना चिंता वाढली. तैमुरला का नाही आणले? तैमुरला मी उचलून घेतले असते, त्याची पप्पी घेतली असती, तैमूर तुम्हाला चालतो, हे हिंदुत्ववादी आहेत. हिंदुत्ववाद्यांना तैमूर चालतो, असा हल्लाबोल त्यांनी पंतप्रधान मोदींवर केला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

