बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अॅक्शनमोडमध्ये
16 जानेवारी रोजी वाहिरा ते पिंपळगाव रोडवरील गायरान जमिनीत या आरोपींनी आजिनाथ विलास भोसले आणि भरत विलास भोसले या दोघांची निर्घृण हत्या केली होती.

बीड : जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. कारण, संतोष देशमुख हत्याप्रकरणाला 100 दिवस पूर्ण झाले असून याप्रकरणासह विविध घटनांमध्ये पोलीस तातडीने पाऊले उचलून कारवाई करत असल्याचे दिसून येते. वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांना अटक केल्यानंतर बीड (Beed) पोलिसांनी खोक्याभाईच्याही मुसक्या आवळल्या आहेत. तसेच, जिल्ह्यातील इतर गुन्हेगारी कारवायांवर देखील पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडच्या टोळीवर मकोका लावल्यानंतर आता आणखी एका सहा जणांच्या गुन्हेगारी टोळीवर मकोका (Mcoca) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या टोळीत तीन महिलांचाही समावेश आहे.
बीडमधील या गुन्हेगारी टोळीतील आरोपींमध्ये दीपक ऊर्फ सलीम नारायण भोसले, सोमीनाथ ऊर्फ नाज्या दिलीप काळे , मुद्दसर मन्सुर पठाण , सोनी ऊर्फ अनिता गोरख भोसले, शशिकला दीपक भोसले आणि संध्या कोहीनुर भोसले यांचा समावेश आहे. या टोळीने बीड, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात विविध गंभीर गुन्हे केले आहेत.
16 जानेवारी रोजी वाहिरा ते पिंपळगाव रोडवरील गायरान जमिनीत या आरोपींनी आजिनाथ विलास भोसले आणि भरत विलास भोसले या दोघांची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर अजून तीन जण फरार आहेत. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, पुरावे नष्ट करणे, रस्ता अडविणे अशा स्वरूपाचे 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी घेतला. सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी प्रस्ताव तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला. विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी या प्रस्तावास मंजुरी दिल्याने आता या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यास मदत होणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बीडमधील मुकादमांवर सर्वाधिक गुन्हे
बीड जिल्ह्यामधल्या दादागिरीचा त्रास केवळ बीड जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नसून संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा त्रास झाला आहे. याचं कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ऊस तोडीसाठी बीड जिल्ह्यातून टोळ्या जात असतात. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये या टोळ्यांच्या मुकादमांकडून ट्रक मालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. संपूर्ण राज्यात अशा पद्धतीने फसवणूक झालेले अडीच हजार गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 90% गुन्हे हे बीड जिल्ह्यातील मुकादमांवर दाखल आहेत.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

