NCP: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये जवळीक वाढली? चर्चा अन् गाठीभेटींचं सत्र; मात्र शिवसेनेच्या दोन्ही गटात अद्याप तणाव
NCP Pune: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये जवळीक वाढत असल्याचं दिसतं, मात्र उद्धवसेना आणि शिंदेसेना यांच्यात ताणतणाव आजही कायम असल्याचं दिसून येतं.

पुणे: पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) मुख्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये काल (शनिवारी) सकाळी भेट झाली. या दोघामध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर राजकीय वर्तुळात चर्चाना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. दरम्यान, 'व्हीएसआय'च्या बैठकीसाठीच आम्ही एकत्रित आल्याचा खुलासा अजित पवार यांनी नंतर केला. मात्र आता या सर्व घटनांमुळे आणि होणाऱ्या बैठका, चर्चा होत आहेत यामुळे आता दोन्ही पक्षांमधील दुरावा कमी होत असल्याची चर्चा आहे.
राज्यात दोन मोठे पक्ष फुटले. एक शिवसेना आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट झाले, पण अलीकडे होणाऱ्या बैठका, चर्चा, कार्यक्रमांना एका मंचावर येण या काही घटना बघता दोन्ही पक्षांमध्ये दुरावा कमी होत असल्याचे चित्र आहे. आता किंवा भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येतील की नाही याबाबत ठोस असं काही सांगता येत नसलं तरी त्यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं जाणवत आहे.
जयंत पाटलांसोबत अजितदादांची हसत-खेळत चर्चा
पुण्यात जानेवारी महिन्यामध्ये वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची (Vasantdada Sugar Institute) 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ पडला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), शरद पवार (Sharad Pawar), दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मंचावर शरद पवारांच्या उजव्या बाजुला अजित पवार तर डाव्या बाजुला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, मात्र, अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं असल्याच्या चर्चा दिसून आल्या.शरद पवार आणि अजित पवारांच्या यांच्यामध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसले असल्याचं दिसून आलं, अजित पवारांच्या शेजारी जयंत पाटील बसले होते, यावेळी अजित पवारांनी आणि जयंत पाटलांनी स्टेजवर हसत हसत चर्चा केल्याचं दिसून आलं. पक्षफुटीनंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे नेते एकाच व्यासपिठावर दिसले, त्यांनी एकदम हसून खेळून चर्चा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यात काय बोलणं झालं असावं याबाबत चर्चा रंगली. या कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि दिलीप वळसे-पाटलांमध्ये काय बोलणं झालं असावं याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.
राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची याचिका
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर आणि दोन्ही पवार वेगवेगळे झाल्यानंतर अजित पवारच्या पक्षाचे प्रफुल्ल पटेल यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी याचिका शरद पवार गटाने राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याकडे केली होती. त्यावेळी वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची याचिका अजित पवार गटाकडून करण्यात आली. मात्र, त्यानंतर याबाबत कोणतीही कारवाई पुढे करू नये असं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी दिले आणि त्या आधारे दोन्ही याचिका धनखड यांनी निकाली काढल्या.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जयंत पाटील अन् अजितदादांची भेट
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जयंत पाटील यांची भेट झाली. त्यात ऊसशेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी चर्चा झाली. तिथे अन्य काहीजणही उपस्थित होते. या भेटीत राजकीय चर्चा काहीही झाली नाही. या भेटीचे चुकीचे अर्थ काढू नयेत असं अजित पवारांनी म्हटलं. मात्र, या बैठकीच्या निमित्ताने दोघे जवळ येत असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.
उद्धवसेना आणि शिंदेसेना यांच्यात ताणतणाव आजही कायम
एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर उद्धवसेना आणि शिंदेसेना यांच्यात ताणतणाव आजही कायम आहे. हे दोन्ही नेते एकमेकांकडे पाहणेदेखील टाळतात, शरद पवार आणि अजित पवार हे ठाकरे-शिंदेंप्रमाणे एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत नाहीत.
एकमेकांवर टीका करणं टाळल्याचं चित्र
विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात दोन पक्षांचे बडे नेते, मंत्री एकमेकांसोबत बरेचदा जेवण सोबत करताना दिसतात. एकमेकांसोबत हास्यविनोद सुरू असतात. छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यात संवाद होताना दिसते.
शिवसेनेच्या दोन्ही गटात अद्याप तणाव
शिवसेना पक्षफुटीनंतर आता देखील दोन्ही पक्षातील तणावाचं चित्र वारंवार दिसून येतं. आमदार शिंदेसेनेच्या मंत्र्यांकडे काम घेऊन फारच कमी प्रमाणात जातात, इकडे अजित पवारांच्या मंत्र्यांकडे शरद पवारांचे आमदार अगदी सहज जाऊन कामे करून आणतात.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये शिंदेसेना-उद्धवसेनेचे आमदार एकमेकांवर टोकाची टीका करतात, पण अजित पवार, शरद पवार गटाच्या आमदारांमध्ये असं काही कमी प्रमाणात दिसत. माध्यमांशी बोलताना सेनेच्या नेत्यांमध्ये जी कटूता दिसते, ती राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन गटातील दुरावा कमी झाल्याचं जाणवतं.
ठाकरे-शिंदे पहिल्यांदाच समोरासमोर, एकमेकांकडे पाहिलंही नाही
शिवसेना फुटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यातील कटूता अगदी आहे तशीच आहे, असं काहीस चित्र काही दिवसांपुर्वी विधानभवनाच्या परिसरामध्ये दिसून आलं. एबीपी माझाच्या कॅमेरामध्ये एक दृश्य कैद झाले आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांशी बोलताना दिसतात, त्यांनी हस्तांदोलन केले, एकमेकांना नमस्कार केलेला आहे. मात्र, त्याच वेळेला त्यांच्या मागून एकनाथ शिंदे हे सुद्धा चाललेले होते, मात्र एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं सुद्धा नाही. देवेंद्र फडणवीसांना भेटून पुढे जाताना उध्दव ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदेंना इग्नोर केल्याचं दिसून आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

