डीएसकेंच्या मेव्हणीला मुंबई उच्च न्यायालयाकडनं जामीन मंजूर, 2 लाखांच्या वैयक्तिक बाँडवर सुटका
अनुराधा पुरंदरे याप्रकरणी तब्बल साडे तीन वर्ष तुरूंगात होत्या. अखेर 2 लाखांच्या वैयक्तिक बाँडवर मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला आहे.
![डीएसकेंच्या मेव्हणीला मुंबई उच्च न्यायालयाकडनं जामीन मंजूर, 2 लाखांच्या वैयक्तिक बाँडवर सुटका Mumbai High Court grants bail to DSK's sister-in-law releases her on Rs 2 lakh personal bond डीएसकेंच्या मेव्हणीला मुंबई उच्च न्यायालयाकडनं जामीन मंजूर, 2 लाखांच्या वैयक्तिक बाँडवर सुटका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/15/5f04a9a5c33461926ec918a1a3952cb1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डीएसकेंच्या मेव्हणीला मुंबई उच्च न्यायालयाकडनं जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनुराधा पुरंदरे यांची 2 लाखांच्या वैयक्तिक बाँडवर सुटका करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली. हा जामीन मंजूर करताना हायकोर्टानं अनुराधा पुरंदरे यांना देशाबाहेर जाण्यास मनाई करत पासपोर्ट तपासयंत्रणेकडे जमा करण्याचे निर्देश दिलेत. तसेच तीन महिन्यांतून एकदा तपासअधिका-यांपुढे हजेरी लावत तपासांत सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
अनुराधा पुरंदरे याप्रकरणी तब्बल साडे तीन वर्ष तुरूंगात होत्या. मात्र त्यांच्याविरोधात लावण्यात आलेले अफरातफरीचे आरोप चुकीचे असून याप्रकरणाशी त्यांचा यात काहीही संबंध नसल्याचं त्यांच्या जामीन अर्जात म्हटलेलं आहे. त्या कुलकर्णी कुटुंबाशी संबंधित असल्या तरी त्यांचा या घोटाळ्याशी काहीही संबंध नाही. त्या केवळ एक कारकून म्हणून डीएसकेंच्या कंपनीत कार्यरत होत्या. याशिवाय या प्रकरणात त्या तीन वर्षांहून अधिककाळ जेलमध्ये आहेत. तसेच हा खटला लवकरात लवकर निकाली निघण्याची शक्यता नाही. या गोष्टी विचारात घेता हायकोर्टानं अनुराधा पुरंदरे यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. गेल्या महिन्यात हायकोर्टानं डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांचाही जामीन मंजूर केला होता. मात्र मुख्य आरोपी डी.एस. कुलकर्णी यांचा जामीन अर्ज मात्र फेटाळण्यात आलाय. ज्याला डीएसके सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.
दरम्यान, अनेक ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल सध्या डी.एस.कुलकर्णींसह त्यांच्या परिवारातील अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कारण, आपल्या परिवारातील अनेकांच्या नावांवार डी.एस.कुलकर्णींनी आपले आर्थिक गैरव्यवहार व्यवहार केल्याचे पुरावे पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)