परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून खुली चौकशी होणार
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून एका नवीन प्रकरणात परमबीर सिंह यांची खुली चौकशी होणार आहे.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजून एका प्रकरणात खुली चौकशी (Open inquiry) केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळाली असून लवकरच परमबीर सिंह यांची खुली चौकशी केली जाईल.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून परमबीर यांच्या विरोधात आधीच एका प्रकरणात चौकशी सुरू आहे. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर आरोप लावले होते. गेल्यावर्षी जेव्हा त्यांना निलंबित करण्यात आलं होतं, तेव्हा परमबीर सिंह यांनी त्यांच्या एका माणसाच्या माध्यमाने अनुप डांगे यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडून चौकशी सुरू आहे.
दुसरी चौकशी ही पोलीस निरीक्षक बी आर घाडगे यांच्या तक्रारीनंतर सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून परमबीर यांची चौकशी करण्यासाठी बी आर घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, लाचलूचपत प्रतिबंधक विभागला पत्र लिहिलं होतं. बी आर घाडगे हे तेच अधिकारी आहेत ज्यांच्या तक्रारीनंतर परमबीर सिंहांवर सर्वप्रथम एप्रिल महिन्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. परमबीर सिंह यांच्यावर अपराधी षड्यंत्र, पुरावे नष्ट करणे आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी मागितली होती जी सोमवारी त्यांना मिळाली. शासकीय अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतरच त्यांच्याविरोधात चौकशी केली जाऊ शकते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर या प्रकरणात आता सखोल चौकशी करू शकते. खुली चौकशीमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राथमिक चौकशी केली जाते. ज्यामध्ये संबंधित व्यक्तीची आर्थिक देवाण-घेवाण तपासली जातात. त्यांच्या नावावर किती मालमत्ता आहे आणि ती मालमत्ता कशी घेतली गेली आहे याची चाचपणी केली जाते. जर या तपासात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला काही संशयित आढळले किंवा त्यांना जर वाटलं की या प्रकरणांमध्ये काही गैरकृत्य केलं गेलं आहे तर या संदर्भात गुन्हा सुद्धा नोंदवला जाऊ शकतो.